अंशकालीन निदेशकांच्या नियुक्त्या रखडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:57 AM2021-02-05T07:57:20+5:302021-02-05T07:57:20+5:30
केदारखेडा : शाळेतील अंशकालीन निदेशकांना २०१६ मध्ये तीन वर्षांसाठी नियुक्त्या दिलेल्या होत्या. त्यांची तीन वर्षांची मुदत संपली आहे. मात्र, ...
केदारखेडा : शाळेतील अंशकालीन निदेशकांना २०१६ मध्ये तीन वर्षांसाठी नियुक्त्या दिलेल्या होत्या. त्यांची तीन वर्षांची मुदत संपली आहे. मात्र, मागीलवर्षी कोरोनामुळे नियुक्त्या मिळाल्याच नाहीत, वर्षभरापासून या निदेशकांना मानधनापासून वंचित राहावे लागले आहे. त्यांना संसाराचा गाडा चालविणेही अवघड होऊन बसले आहे.
ज्या शाळेत सहावी ते आठवी वर्गातील विद्यार्थिसंख्या शंभर असेल, अशा शाळेत कला, क्रीडा, कार्यानुभव निदेशकांच्या नियुक्त्या देण्यात येतात. २०१६ मध्ये तीन वर्षांसाठी नियुक्त्या दिल्या होत्या. त्यांची मुदतसेवा संपल्यावर पटसंख्या असलेल्या शाळेत सन २०१९-२० यावर्षी नियुक्त्या मिळण्याची आशा होती. मात्र, कोरोनामुळे नियुक्त्या रखडल्या. तरीही निदेशकांनी विनामानधन काम केले. शाळेत पटसंख्या असूनही कोरोनाच्या काळातही मानधन नसल्यामुळे या निदेशकांचा संसार उघड्यावर आला. कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असल्याने या निदेशकांंना काम करत असताना अल्पसेही मानधनही मिळाले नाही.
.....कोट
...तर टळली असती उपासमार
कोरोना संसर्गाच्या काळात शारीरिक शिक्षण व आरोग्य या पदावरील निदेशकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत कार्य केले असते. जबाबदारी बघून नियुक्त्या मिळाल्या असत्या, तर निदेशकांवर उपासमारीची वेळ आली नसती.
-प्रदीप बोरडे, शारीरिक शिक्षण निदेशक
...
नियुक्ती लवकर मिळावी
निदेशकांना कायमस्वरूपी नियुक्त्या मिळतील, अशी आशा गेल्या सहा वर्षांपासून बाळगत आहोत. प्रशासनाने सन २०१२-१३ ते २०१९ पर्यंत काम केलेल्या निदेशकांना अजूनही अपेक्षा आहे, आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. पटसंख्या देखील आहे, तेव्हा लवकर निदेशकाला नियुक्त्या देऊन, होणारी उपासमार टाळावी.
-प्रताप ठोंबरे, कला, निदेशक
......
चौकट-
आदेश येईपर्यंत नियुक्त्या नाही
अंशकालीन निदेशकांनी सहा वर्षे काम केले. कला, क्रिडा, कार्यनुभव विषयांच्या निदेशकांमुळे शाळेच्या पटसंख्येतही वाढ झाली आहे. परंतू शाळेत पंटसंख्या असुनही वरिष्ठस्तरावरून आदेश येईपर्यंत नियुकत्या देता येणार नाही, असे केदारखेडा येथील केंद्रप्रमुख आर. पी.भाले यांनी स्पष्ट केले.