मनमाड ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत दुहेरीकरणाला मंजुरी
By दिपक ढोले | Published: August 6, 2023 03:48 PM2023-08-06T15:48:25+5:302023-08-06T15:48:44+5:30
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती
जालना : मनमाड ते छत्रपती संभाजीनगरपर्यंतच्या दुहेरीकरणाला मंजुरी मिळाली असून, यासाठी ९६० कोटी रुपयांचा निधीदेखील मंजूर झाला आहे. हे कामही लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जालना येथील रेल्वेस्थानक इमारतीचे भूमिपूजन झाल्यानंतर दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. दानवे पुढे म्हणाले की, देशभरातील ५०८ स्थानकांच्या इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. या सर्व रेल्वेस्थानकांचे काम ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे. १८ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. मराठवाड्यात रेल्वेचे जाळे वाढविण्यासाठी जालना -जळगाव, जालना-खामगाव या दोन्ही मार्गांचे काम लवकरच हाती घेण्यात येईल. शिवाय, मनमाड ते छत्रपती संभाजीनगरपर्यंतच्या दुहेरीकरणालाही मंजुरी मिळाली आहे. यासाठी ९६० कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. दुसऱ्या टप्प्यात जालन्यापर्यंत दुहेरीकरण केले जाईल, असेही ते दानवे म्हणाले.
दोन डेलिकेटेड फ्रेट कॉरिडोअर निर्माण करणार
अनेकवेळा पॅसेंजर रेल्वे आली तर मालवाहतूक गाडी बाजूला लावावी लागते. त्यामुळे माल वाहतुकीस वेळ लागतो. यासाठी देशात दोन डेलिकेटेड फ्रेट कॉरिडोअर तयार केले जाणार आहे. दिल्ली ते मुंबईपर्यंत नवीन डेलिकेट फ्रेट कॉरिडोअर तयार करणार असल्याचेही ते म्हणाले.