२५७ कोटींच्या आराखड्यास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 01:06 AM2020-01-25T01:06:11+5:302020-01-25T01:06:54+5:30
लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचा आदर राखत त्यांना विश्वासात घेऊन विकास कामे अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा वार्षिक समितीच्या बैठकीस उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पदाधिकारी व अधिकारी ही रथाची दोन चाके आहेत. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी
सकारात्मक दृष्टिकोन ठेवून
पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी एकसंघपणे काम करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचा आदर राखत त्यांना विश्वासात घेऊन विकास कामे अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा वार्षिक समितीच्या बैठकीस उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार नारायण कुचे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार अंबादास दानवे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य शंकर नागरे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुकांमुळे चालू वित्तीय वर्षामध्ये मंजूर निधीच्या केवळ ६० टक्केच निधी यंत्रणांना वितरित करण्यात आला होता. उर्वरित ४० टक्के निधी येत्या आठ दिवसांच्या आत वितरित करण्यात येणार आहे. निधी खर्च करण्यासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून यंत्रणांना वितरित करण्यात आलेला निधी पूर्ण कसा खर्च होईल, याची दक्षता घेण्यात यावी. प्राप्त निधीचा विनियोग योग्य पद्धतीने करण्यात यावा, निधीचा अपव्यय होणार नाही याचीही काळजी यंत्रणांनी घ्यावी.
या बैठकीत २०२० च्या २५७ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत १८१ कोटी १३ लाख रुपये, जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत ७३ कोटी ९६ लाख आणि जिल्हा वार्षिक योजना (ओटीएसपी) अंतर्गत दोन कोटी २५ लाख ९१ हजार रुपये अशा वित्तीय तरतुदीचा आराखडा मंजूर करण्यात आला. यामध्ये कृषी, पशुसंवर्धन, वने व सहकार आदींसाठी २८ कोटी ९१ लक्ष, ग्रामविकास- १० कोटी, लघुपाटबंधारे व कोल्हापुरी बंधारे-१२ कोटी ५० लक्ष, विद्युत-१० कोटी, रस्ते विकास-२८ कोटी ५५ लक्ष, आरोग्य- ३३ कोटी ७८ लक्ष, नगरपालिका व नगरविकास-११ कोटी ७६ लक्ष, अंगणवाडी बांधकाम- ६ कोटी तर शासकीय ईमारतींसाठी ७ कोटी ३६ लाख रुपये आदी कामांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली.
तरतूद : शाळांच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी
जालना जिल्ह्यामध्ये शाळाखोल्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. शाळाखोल्यांच्या बांधकामासाठी तसेच दुरुस्त्यांसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून शिक्षण विभागाला निधी देण्यात येतो; परंतु हा निधी या कामासाठी पुरेसा नसल्याने जिल्ह्यातील शाळाखोल्यांसाठी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करुन अधिकचा निधी कसा प्राप्त करुन घेता येईल, यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विजेचे जाळे वाढविण्यासह नवीन ट्रान्सफार्मरसाठी निधी खेचून आणणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. रिक्त पदे भरण्यासाठीदेखील आम्ही आग्रही राहणार असल्याचे ते म्हणाले.