१.६३ कोटी रुपयांच्या टंचाई आराखड्यास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 12:35 AM2020-03-20T00:35:14+5:302020-03-20T00:36:06+5:30
पाणीटंचाई निवारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने १ कोटी ६३ लाख ८१ हजार रुपयाच्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यास मंजुरी दिली
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : वार्षिक सरासरीपेक्षा जाफराबाद तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असतानाही उन्हाळ्यात जवळपास ६३ गावांना पाणीटंचाईच्या झळा बसणार आहे. तालुक्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने १ कोटी ६३ लाख ८१ हजार रुपयाच्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यास मंजुरी दिली आहे.
जाफराबाद तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे मागणी केल्यानुसार जानेवारी ते जून संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता. हा आराखडा मंजुरीसाठी जालना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे पाठविण्यात आला. या आराखड्यास पाणीपुरवठा विभागाने मंजुरी दिली असून, जानेवारी ते जून या पहिल्या टप्यात २२ गावांतील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतून विशेष नळ योजनांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी ४८ लाख ६५ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात एप्रिल ते जून महिन्यात ६३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये २० गावांत टँकरद्वारे तर १९ गावांमध्ये खाजगी विहिरी अधिग्रहण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी १ कोटी ६३ लाख ८१ हजार रुपये खर्च करणे आवश्यक आहे. त्यामुळे येणाºया काळात पाणीटंचाईवर काय उपाय- योजना केल्या जातात आणि प्रत्यक्षात किती खर्च करण्यात येतो, हे पाहावे लागणार आहे.
दरवर्षी आ. संतोष दानवे हे सर्व विभागाचे अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत आढावा बैठक येऊन गावनिहाय सविस्तर चर्चा करून आढावा घेतात. मात्र, यावर्षी तसे न होता पंचायत समितीच्या मासिक बैठकीत ग्रामसेवकांनी मागणी केल्यानुसार संभाव्य आराखडा तयार करण्यात आला आहे.
या गावांतील नळ योजनांची होणार दुरुस्ती
तालुक्यातील २२ गावांत सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नळ योजनांची दुरुस्ती केली जाणार आहे. यामध्ये सातेफळ गावात तात्पुरती पूरक नळ योजना सोडल्यास देऊळझरी, बोरखेडी गायकी, आरदखेडा, गोकुळवाडी, टाकळी, गारखेडा, काळेगाव, खानापूर, वरखेडा फिरंगी, नांदखेडा तांडा, शिराळा, आळंद, माहोरा, वरुड खुर्द, दहिगाव, सावंगी, पापळ, देळेगव्हाण, गोपी या गावांतील योजनांची दुरूस्ती करण्यात येणार आहे.