अर्जुन खोतकरांनी शक्तीप्रदर्शन न करता भरला उमेदवारी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 01:20 AM2019-10-02T01:20:42+5:302019-10-02T01:21:34+5:30
अर्जुन खोतकर हे पन्नास हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय होतील, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकसभा निवडणुकी प्रमाणेच महायुतीचा दबदबा जालना विधानसभा मतदारसंघात कायम राहणार असून राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे पन्नास हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय होतील, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे बोलताना व्यक्त केला
जालना विधानसभा मतदार संघातील शिवसेना, भाजपा, रिपाइं, रासप महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला. कुठलेही शक्तिप्रदर्शन न करता साध्या पद्धतीने खोतकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.
खोतकर पती-पत्नी कोट्यधीश
जालना : जालना विधानसभा मतदार संघातून राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल करतांना निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात संपत्तीचे विवरण जोडले आहे. त्यातील माहितीनुसार खोतकर पती-पत्नी कोट्यधीश असून पत्नी सीमा खोतकर यांनी पती अर्जुन खोतकरांना १५ लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. विशेष म्हणजे या विवरणात सीमा खोतकर आणि अभिमन्यू खोतकर यांचे करपात्र उत्पन्न नसून ते शेतीतून आलेले उत्पन्न असल्याचे मानले जाते.
जालना विधानसभा मतदार संघातून खोतकर यांनी कुठलाही बडेजाव न करता मुहूर्त साधत मंगळवारी उमेदवारी अर्ज जालना येथील तहसील कार्यालयात सादर केला. यावेळी शपथपत्रामध्ये दिलेल्या माहितीत अर्जुन खोतकरांकडे ३१ लाख १४ हजार रुपये रोख, पत्नीकडे ५० हजार, मुलगा अभिमन्यू खोतकरकडे ७ हजार रुपये रोख असल्याचे नमूद केले आहे. सीमा खोतकरांनी अर्जुन खोतकरांना १५ लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. अर्जुन खोतकर यांच्या नावे सावरगाव येथे ७.५ एकर शेतजमीन
असून त्यातून १७ लाख ५६ हजार रुपयाचे उत्पन्न दर्शविण्यात आले आहे. अर्जुन खोतकरांचा मुंबई येथे फ्लॅट असून ज्याचे बाजारमूल्य १ कोटी ७८ लाख रुपये आहे.
खोतकरांकडे २० ग्रॅम सोने असून ज्याची किंमत ७८ हजार रुपये आहे. तर त्यांच्या पत्नी सीमा खोतकरांकडे ७०० ग्रॅम सोने असून ज्याची किंमत २७ लाख ३२ हजार रुपये एवढी आहे. अभिमन्यू खोतकरकडे ५० ग्रॅम सोने असून ज्याची किंमत १ लाख ९५ हजार रुपये होते.
एकूणच खोतकरांनी जे शपथपत्र दिले आहे. त्यात गुन्हे दाखल नसल्याचे म्हटले आहे. या शपथपत्रातून खोतकरांचा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत हा शेती आणि शेतीसमकक्ष व्यवसाय हेच असल्याचे दिसून येते.
वारसा हक्काने अर्जुन खोतकरांकडे मिळालेल्या संपत्तीचे बाजारमूल्य ६२ लाख रुपये आहे तर सीमा खोतकर यांच्या स्वसंपादित केलेल्या संपत्तीची किंमत १ कोटी ७३ लाख रुपये आहे. एकूण करपात्र उत्पन्न हे १९ लाख रुपये आहे. २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात खोतकरांचे उत्पन्न १९ लाख ६५ हजार रुपये होते. ते २०१८-१९ मध्ये २७ लाख ४४ हजार रुपये झाले आहे. ज्याची वाढ १४० टक्क्यांमध्ये गणली जाते.
अर्जुन खोतकरांवर १ कोटी ७ लाख रुपयांचे कर्ज असून शासकीय देणी ही २५ हजार रुपयांची आहेत. मुंबई येथील एसबीआय बँकेत १२ लाख ९२ हजार रुपयांच्या ठेवी आहेत. विशेष म्हणजे खोतकरांनी या शपथ पत्रात कुठलेही स्वमालकीचे वाहन असल्याचे दर्शविलेले नाही.