उद्धव ठाकरेंसोबत राहणार की शिंदे गटात जाणार?; अर्जुन खोतकर उद्या घोषणा करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 08:02 PM2022-07-29T20:02:43+5:302022-07-29T20:07:38+5:30
अर्जुन खोतकर आज आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
जालना- शिवसेनेचे माजी मंत्री आणि उपनेते अर्जुन खोतकर यांच्याबद्दल दररोज वेगवेगळी विधाने समोर येत आहेत. मात्र आता स्वत: अर्जुन खोतकरांनीच शिंदे गटात जाणार की नाही, याचा निर्णय उद्या जाहीर करणार असल्याची माहिती दिली आहे. आज अर्जुन खोतकर जालन्यात दर्शना बंगल्यावर दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत फटाके फोडून स्वागत करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अर्जुन खोतकर आज आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांशी चर्चा झाल्यानंतर अर्जुन खोतकर हे उद्या आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या चार दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याच्या चर्चेनंतर अर्जुन खोतकर हे आज थेट दिल्लीवरून जालना शहरात असलेल्या त्यांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत. अर्जुन खोतकर जाण्यात दाखल होण्यापूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यानी मोठ्या प्रमाणात याठिकाणी गर्दी करायला सुरुवात केली होती.
जालना जिल्ह्यातील खोतकर समर्थकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सिल्लोड दौऱ्याच्या स्वागताच्या बॅनरवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत अर्जुन खोतकर यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर यांचा शिंदे गटातील प्रवेश हा निश्चित झाला असल्याचही सांगितलं जात आहे.
दानवे -खोतकर यांच्यात समेट
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदेंसोबत अर्जुन खोतकर आणि आमच्यात चर्चा झाल्याचे मान्य करून राजकीय वाद मिटवून सोबत राहण्याचे सांगितले. ते आपण मान्य केल्याचे दानवे यांनी सांगितले. खोतकरांच्या शिंदे गटाच्या प्रवेशावर दानवेंनी प्रतिक्रिया दिली नाही.