मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन अर्जुन खोतकर जरांगे पाटलांच्या भेटीला, नेमकी काय चर्चा झाली, पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 02:42 PM2023-09-04T14:42:22+5:302023-09-04T14:52:55+5:30
मराठा आरक्षणाबाबत आज तोडगा निघण्याची शक्यता आहे.
जालना: जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी झालेल्या लाठीचार्जमुळे राज्यात वातावरण तापले आहे. आतापर्यंत अनेक नेत्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली असून, आरक्षणाबाबत सकारात्कमकता दर्शवली आहे. यातच आता शिवसेना नेते अर्जुन खोतकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोफ घेऊन जरांगे यांच्याकडे गेले आहेत.
मराठा आरक्षणावर उपसमितीच्या बैठकीत तोडगा निघाल्याचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकर आणि महादेव जानकर यांनी मनोज जरांगे यांची उपोषणस्थळी भेट घेतली असून, खोतकरांनी चर्चेसाठी दार खुलं करा, अशी विनंती जरांगे यांना केली आहे. जरांगे यांनीदेखील चर्चेसाठी तयारी दर्शवली आहे. पण, तुम्ही जीआर घेऊन या, मगच उपोषण मागे घेतो, असं जरांगे पाटील म्हणाले.
यावेळी अर्जुन खोतकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे फोनवरुन बोलणे झाले आहे. आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केले आहे. मला खात्री आहे, मनोज जरांगे यांचा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात इतर ठिकाणी मराठा समाजाला कुणबी म्हणून मान्यता आहे. आरक्षणविषयक समितीही सकारात्कम निर्णय घेईल. मुख्यमंत्री लवकरच याबाबत माहिती देतील, अशी माहिती खोतकर यांनी दिली.
मराठा आरक्षणविषयक उपसमितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत तोडगा निघाल्याची चर्चा आहे. पण नेमकी काय चर्चा झाली, हे लवकरच कळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देतील. यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती असणार आहे.