दानवेनंतर खोतकरांनी घेतली सत्तारांची गळाभेट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:46 AM2019-03-04T00:46:56+5:302019-03-04T00:47:24+5:30
जालना येथे शनिवारी खा. रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात झालेल्या गळाभेटीची चर्चा सुरु असतानाच रविवारी खोतकर यांनी सिल्लोड येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांचीही गळाभेट घेतल्याने चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.
सिल्लोड/ जालना : जालना येथे शनिवारी खा. रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात झालेल्या गळाभेटीची चर्चा सुरु असतानाच रविवारी खोतकर यांनी सिल्लोड येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांचीही गळाभेट घेतल्याने चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. मी अजून रणांगण सोडले नसल्याचे खोतकर यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. तर दुसरीकडे खोतकर यांचे मन वळविण्यासाठी सोमवारी सहकार मंत्री सुभाष देशमुख हे मुख्यमंत्र्यांचे खास दूत म्हणून जालन्यात येत आहेत. यामुळे खोतकरांची यापुढील राजकीय वाटचाल कशी असेल, याचीच सर्वांना उत्सुकता लागून आहे.
सिल्लोड न.प. च्या नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेवकांच्या सत्कारानिमित्त रविवारी आ. अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास खोतकर येथे आले होते. लोकसभा निवडणुकीत खा. दानवे यांच्या विरोधात ‘अर्जुनास्त्र’ तयार असल्याचे संकेत खोतकर यांनी दिले. यावेळी दोघांची गळाभेट बघून पुन्हा नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे.
शनिवारी जालना येथे दीर्घ काळानंतर दानवे व खोतकर एका व्यासपीठावर आले होते. मध्यंतरीच्या काळात दोघांमधून विस्तवही आडवा जात नसताना शनिवारी मात्र दोघे घनिष्ठ स्नेही असल्यागत भेटल्याने खोतकरांमधील ‘बंडोबा’ थंड झाला असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर दुसऱ्याच दिवशी खोतकर चक्क काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसल्याने मराठवाड्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे. दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असून त्यांना विजयी करणे भाजपसाठी प्रतिष्ठेचे बनले आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घातले आहे. त्यामुळे भाजपचे नेतृत्व कुठलाच धोका पत्करण्यास तयार नाही. येन-केन प्रकारे खोतकर यांचे मन वळवून त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखणे हा एकमेव ‘अजेंडा’ सध्या भाजप नेतृत्वासमोर आहे.
एकीकडे खोतकर यांना काँग्रेसकडून खुली आॅफर आहे. मात्र गेली ३० वर्ष कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून बनलेली ओळख सोडून सेनेतून ‘सेक्युलर’ पार्टीत प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढविणे म्हणजे एक मोठे आव्हान असेल. त्यामुळे ते देखील काँग्रेसची आॅफर स्वीकारण्याबाबत द्विधा मनस्थितीत असल्याचे दिसून येते. खोतकर काँग्रेसमध्ये आल्यास त्यांचे जालन्यातील कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेस पक्षाबाबत विचार करण्याची सूचक भाषा वापरली आहे, त्यामुळे काँग्रेस नेतृत्वही संभ्रमावस्थेत सापडले आहे.
सहकारमंत्री देशमुख यांना खोतकरांकडे पाठविण्यामागे देखील भाजप नेतृत्वाचे राजकारण आहे. खोतकर हे जालना बाजार समितीचे २००७ पासून सभापती आहेत. तसेच रामनगर येथील जालना साखर कारखान्याचा मुद्दाही तेवत राहिलेला आहे. त्यामुळे मुद्दाम देशमुख यांनाच खोतकरांकडे पाठवून भाजप नेतृत्व एका प्रकारे चाणक्य नीतीचाही अवलंब करत असल्याचे बोलले जात आहे.