खोतकरांनी विधानसभेवर दावा करावा, लोकसभेवर नाही; रावसाहेब दानवेंनी समेटानंतरही ऐकवले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 06:23 AM2022-08-01T06:23:58+5:302022-08-01T06:24:24+5:30
खा. संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबाबत बोलताना दानवे म्हणाले, ईडी असो किंवा सीबीआय या स्वतंत्र यंत्रणा असून, त्यात सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जालना लोकसभा मतदारसंघ ९ वेळा झालेल्या निवडणुकांपैकी ५ वेळा भाजपने जिंकला आहे. ही जमीन ४५ वर्षांपासून आम्ही नांगरत असून, आता त्यात माल येत आहे. ती जमीन आता कुणालाही पाय ठेवायला देणार नाही. हा भाजपचा मतदारसंघ आहे. त्यामुळे अर्जुन खोतकरांनी विधानसभेवर दावा करावा, लोकसभेवर नाही, असा स्पष्ट सल्ला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला, तसेच ईडीच्या कारवाईमुळे नाही, तर राजकीय सोयीमुळे खोतकरांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विभागीय आयुक्तालयात दानवे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, खोतकरांचे क्षेत्र वेगळे, माझे वेगळे आहे. मी लोकसभेचा तर ते विधानसभेचे उमेदवार आहेत, त्यांनी विधानसभेवर दावा सांगावा. जालना लोकसभा मतदारसंघ दानवेच्या बापाची जहागिरी नाही. दानवे नसतील तर आ. हरिभाऊ बागडे किंवा अन्य कुणीही लढेल. भाजप हा मतदारसंघ सोडण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगून ते म्हणाले, शिवसेना सोडून शिंदेसेनेत का आले, याचे उत्तर खोतकरच देतील.
भाजपवर आरोप म्हणजे कृत्यांवर पांघरूण
खा. संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबाबत बोलताना दानवे म्हणाले, ईडी असो किंवा सीबीआय या स्वतंत्र यंत्रणा असून, त्यात सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही. लालूप्रसाद यादव असतील, सुरेश कलमाडी यांच्यावर भाजपच्या काळात छापेमारी झाली नाही. गुजरातमध्ये पंतप्रधान मोदी यांचा सीबीआयने छळ केला, तो काय आमच्या काळात झाला नव्हता. ईडीच्या कारवायांमागे भाजप असल्याचा आरोप करणे म्हणजे केलेल्या कृत्यांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न आहे.