मित्रपक्षांचे पाठबळ, अचूक नियोजन; जालन्यात अर्जुन खोतकरांच्या विजयाची अशी आहेत कारणे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 08:56 PM2024-11-26T20:56:07+5:302024-11-26T21:00:02+5:30

३१ हजारांच्या मताधिक्याने विजय : निकालानंतर समर्थक, कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

Arjun Khotkar's win in Jalna, Kailas Gorantyal's heavy defeat | मित्रपक्षांचे पाठबळ, अचूक नियोजन; जालन्यात अर्जुन खोतकरांच्या विजयाची अशी आहेत कारणे

मित्रपक्षांचे पाठबळ, अचूक नियोजन; जालन्यात अर्जुन खोतकरांच्या विजयाची अशी आहेत कारणे

जालना : राज्याचे लक्ष लागलेल्या जालना विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी ३१ हजार ६५१ इतक्या मताधिक्याने बाजी मारली. तर काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा दारुण पराभव झाला.

जालना विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत २६ उमेदवार उभे होते. त्यातही काँग्रेसकडून कैलास गोरंट्याल, शिंदेसेनेकडून अर्जुन खोतकर यांच्यातच सरळ लढत होत होती. त्यातही वंचितचे डेव्हिड घुमारे, भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार अशोक पांगारकर, काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीतील चुरस वाढली होती. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उमेदवारांनी एकमेकांवर टीकेचे बाण सोडत वातावरण चांगलेच तापविले होते. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत जालना विधानसभा मतदार संघात ६४.३९ टक्के मतदान झाले होते. तर शनिवारी झालेल्या मतमोजणीनंतर या मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकला असून, शिंदेसेनेचे अर्जुन खोतकर यांनी ३१ हजार ६५१ मते अधिक घेत विजय मिळविला. खोतकर यांना १ लाख ४ हजार ६६५ इतकी तर पराभूत उमेदवार गोरंट्याल यांना ७३ हजार १४ मते मिळाली आहेत.

या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज यांना ३० हजार ४५४, वंचितचे उमेदवार डेव्हिड घुमारे यांना ६,३२२, भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार अशोक पांगारकर यांना २,२२७ मते मिळाली. एकूणच या निकालानंतर अर्जुन खोतकर, अभिमन्यू खोतकर यांच्यासह महायुतीतील मित्र पक्षांच्या पदाधिकारी, समर्थकांसह शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. मतमोजणी केंद्रासह खोतकर यांच्या निवासस्थान परिसरातही एकच जल्लोष केला जात होता. खोतकर समर्थकांनी रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध भागात एकच जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी केली.

विजयाची तीन कारणे
१. महायुती सरकारने राबविलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा सरकारबाबत सकारात्मक दृष्टिकोन.
२. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्जुन खोतकर यांना पाठबळ देत विकास कामांसाठी दिलेला भरघोस निधी.
३ मित्रपक्ष भाजपचे रावसाहेब दानवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अरविंद चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत दिलेल्या पाठबळामुळे विजयाचा मार्ग सुकर झाला.

गोरंट्याल यांच्या पराभवाचे कारण...
काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांचा ३१ हजार ६५१ मतांनी पराभव झाला. तर काँग्रेस पक्षातील बंडखोर उमेदवार अब्दुल हाफिज यांनी ३० हजार ४५४ मते घेतली. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत निकाल लागेल, ही मविआची आशा विधानसभेच्या निकालात फोल ठरली.

उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते
अर्जुन पंडितराव खोतकर शिवसेना १,०४,६६५
किशार यादव बोरुडे बहुजन समाज पार्टी ९००
कैलास किसनराव गोरंट्याल इंडियन नॅशनल काँग्रेस ७३,०१४
असदउल्ला शेख अमान सोशल डेमोक्रॅटिक
उल्ला शहा पार्टी ऑफ इंडिया ८६९
डेव्हिड प्रल्हादराव घुमारे वंचित बहुजन आघाडी ६३२२
नीला गाैतम काकडे विकास इंडिया पार्टी १३१
मिलिंद बालू बोडे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ३६३
ॲड. योगेश दत्तू गुल्लापेल्ली ऑल इंडिया फाॅरवर्ड ब्लाॅक ९२
विकास छगन लहाने पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) १४९
विजय पंडितराव वाढेकर संभाजी ब्रिगेड पार्टी १३१
विनोद राजाभाऊ मावकर राष्ट्रीय समाज पक्ष ९८
अन्वर कुरेशी सलीम कुरेशी अपक्ष १०८
अनिस शमशोद्दीन सय्यद अपक्ष १५७
अफसर फरिदशेख चाैधरी अपक्ष ५२८
अब्दुल हफिज अब्दुल गफ्फार अपक्ष ३०,४५४
अर्जुन दादा पाटील भांदरगे अपक्ष ९८५
अर्जुन सुभाष कणिसे अपक्ष ६८८
अशोक उर्फ लक्ष्मीकांत मनोहर पांगारकर अपक्ष २२२७
आनंदा लिंबाजी ठोंबरे अपक्ष २७०
कुंडलिक विठ्ठल वखारे अपक्ष ११८
गणेश दादाराव कावळे अपक्ष १०८
योगेश सखाराम कदम अपक्ष १०३
रतन आसाराम लांडगे अपक्ष ५१
विशाल लक्ष्मण हिवाळे अपक्ष १२३
सपना विनोद सुरडकर अपक्ष १०१
ॲड. संजय रघुनाथ राैंदळे अपक्ष ३७२

Web Title: Arjun Khotkar's win in Jalna, Kailas Gorantyal's heavy defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.