सशस्त्र टोळक्याचा धुडगूस...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:56 AM2019-08-27T00:56:49+5:302019-08-27T00:58:19+5:30
बुुंदेले चौकात सोमवारी दुपारी १२ ते १४ जणांच्या टोळक्याने हातात धारदार शस्त्रे घेऊन धुडगूस घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील बुुंदेले चौकात सोमवारी दुपारी १२ ते १४ जणांच्या टोळक्याने हातात धारदार शस्त्रे घेऊन धुडगूस घातला. एका महिलेच्या गळ्यावर चाकूने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली. दरम्यान, घटनास्थळी आलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याने पिस्तूल रोखल्याने आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना शहरातील जेईएस महाविद्यालयानजीकच्या बुंदेले चौक भागात मंगलसिंग ठाकूर यांचे घर आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास १२ ते १४ जणांचे एक टोळके दुचाकीवरून या चौकात आले. शोभा मोहनसिंग ठाकूर (५५) यांच्या घरात घुसून ‘तुम्हारा लडका मंगल कहाँ है, उसने वैभव को क्यो मारा’ असे म्हणत शोभा ठाकूर यांच्यासह त्यांच्या आई, भावास शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच चाकूने गळ्यावर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार शोभा ठाकूर यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून राहुल ढाकणे, वैभव ढाकणे व इतर १० ते १२ जणांविरूध्द कलम ३०७,४५२, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ भादंविसह कलम १३५ म.पो.का. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि जाधव हे करीत आहेत.
दरम्यान, घटना घडतेवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ सॅम्युअल कांबळे हे या भागातून जात होते. घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. आक्रमक झालेले टोळके पाहून प्रसंगावधान राखत त्यांनी टोळक्याच्या दिशेने पिस्तूल रोखले. कांबळे यांनी रोखलेले पिस्तूल पाहून युवकांनी तेथून पळ काढला. कांबळे यांनी एका युवकाला ताब्यात घेतले. तोपर्यंत सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोउपनि जाधव, पोउपनि रूपेकर, सपोउपनि बनसोडे यांनीही घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना..
घटनास्थळावरून पळून गेलेल्या युवकांच्या दुचाकी सदर बाजार पोलिसांनी ताब्यात जप्त केल्या. राहुल ढाकणे, वैभव ढाकणे या दोघांसह इतर काही जणांना ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध सुरू असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांनी दिली.