पिठोरी सिरसगाव येथे सशस्त्र दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:15 AM2018-05-11T01:15:11+5:302018-05-11T01:15:11+5:30
अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथे बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून सुमारे सात लाख रुपये किमतीचे २५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथे बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून सुमारे सात लाख रुपये किमतीचे २५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. गत काही दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पिठोरी सिरसगाव येथे गावाच्या सुुरुवातीलाच ओमप्रकाश उर्फ यशवंत आबासाहेब उढाण यांचे घर आहे. बुधवारी लाईट नसल्यामुळे रात्री ओमप्रकाश उढाण, मुलगा गोविंद पत्नी मंगलबाई हे घराच्या गच्चीवर झोपले होते. तर मुलगी कोमल ही घरात झोपलेली होती.
दरोडेखोरांनी उढाण कुटुंबियांवर पाळत ठेवून मागच्या दरवाजाने घरात प्रवेश केला. गच्चीवर झोपलेल्यांना खाली येता येऊ नये म्हणून दरवाजा जिन्याचा दरवाजाला आतून कडी लावून घेतली. घरात झोपलेल्या कोमलला कोयत्याचा धाक दाखवून कपाटाच्या चाब्या मागितल्या. तिने माहिती नसल्याचे सांगितल्यानंतर दरोडेखोरांनी सोबत आणलेल्या लोखंडी गजाने कपाटाचे दरवाजे तोडले.
कोमलला आरडाओरडा केल्यास बाहेर उभे असलेली आमची माणसे तुला मारहाण करतील, असे धमकावले. चोरटे कपाटातील सोने ठेवलेले डबे, मोबाईल व कपाटाचे ड्रॉवर घेऊन घरासमोरील उसाच्या शेतात गेले. ड्रॉवरमधील सोन्याचे गंठण, मोहनमाळ लॉकीट, झुंबर, अंगठ्या, पाटल्या, चेन इ. दागिने लंपास केले. त्यानंतर ड्रॉवर ऊसाच्या शेतातच टाकून दिले. शेजारीच राहत असलेल्या धनंजय सुभाष उढाण यांच्या घराकडे मोर्चा वळून त्यांच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
पहाटे घटनेची माहिती मिळाल्यानंतर गोंदी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल परजने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. श्वानाने घरासमोरील उसाच्या शेतापर्यंत माग काढला. उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनुने घटनास्थळी भेट देऊन तपास अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
अंबडमध्ये साईबाबांचा मुकुट चोरला
अंबड: येथील श्रीसाईबाबा मंदिरातील सार्इंच्या डोक्यावरील चांदीचा २५० ग्रॅमचा मुकुट चोरट्यांनी गुरुवारी सकाळी चोरून नेला. शहरातील पाचोड रोडवरील इच्छापूर्ती श्री साईबाबा मंदिरात साईबाबा यांच्या मूर्तीवर दर गुरुवारी चांदीचा मुकुट ठेवण्यात येतो. साईबाबांच्या शेज आरतीनंतर सायंकाळी सातला मुकुट काढून ठेवला जातो. सकाळी सहा वाजता मूर्तीवर ठेवलेला मुकुट चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मंदिराचे रवींद्र बापूराव कारके यांच्या फिर्याद वरुन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.