पंचाचे व्हॉईस रेकॉर्डर घेऊन पळलेल्या लाचखोर पोलिसाला अखेर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 04:31 PM2018-06-22T16:31:04+5:302018-06-22T16:31:04+5:30
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने लावलेला सापळा लक्षात आल्याने पंचाने कॉलरला लावलेला व्हॉईस रेकॉर्डर घेऊन धूम ठोकलेला श्रीकृष्ण राऊत हा पोलीस कॉन्टेबल अखेर बुधवारी रात्री जेरबंद झाला.
जालना : लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने लावलेला सापळा लक्षात आल्याने पंचाने कॉलरला लावलेला व्हॉईस रेकॉर्डर घेऊन धूम ठोकलेला श्रीकृष्ण राऊत हा पोलीस कॉन्टेबल अखेर बुधवारी रात्री जेरबंद झाला. ज्याच्यासाठी तो लाच स्वीकारत होता तो सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील काकडे अद्याप फरार आहे.
हाणामारीच्या एका प्रकरणात आरोपीला अटक न करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील काकडे यांनी ३० हजार रूपये लाचेची मागणी केली होती. परंतु तडजोडीनंतर १० हजार रूपये देण्याचे ठरले होते. हे दहा हजार रूपये कुठे आणि कोणाकडे द्यायचे हे निश्चित नसल्याने १४ जून रोजी अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच सापळा लावला होता. लाचेची ही रक्कम कॉन्स्टेबल राऊत सवीकारणार होता, मात्र आपल्याविरूध्द कटकारस्थान होत असल्याचा संशय आल्याने त्याने पंचाच्या कॉलरला लावलेले व्हाईस रेकॉर्डर हिसकावून तेथून पळ काढला.
बुधवारी रात्री उशिरा त्याला त्याच्या घरातून पोलिसांनी उचलले. लाच प्रकरणातील काकडे अद्याप फरार आहे. गुरूवारी त्याला येथील जिल्हा सत्र न्यायाधीश चौथे आर.एम. मिश्रा यांच्यासमोर हजर केले असता, २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकारपक्षाकडून जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. विपुल देशपांडे यांनी बाजू मांडली.