घरोघरी महालक्ष्मीचे उत्साहात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 01:00 IST2019-09-06T01:00:29+5:302019-09-06T01:00:56+5:30
गणपती पाठोपाठ गौरी अर्थात महालक्ष्मीचे आगमन होते, गुरूवारी दुपारपासूनच महालक्ष्मीची आरास सजविण्यात महिला मग्न होत्या.

घरोघरी महालक्ष्मीचे उत्साहात आगमन
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गणपती पाठोपाठ गौरी अर्थात महालक्ष्मीचे आगमन होते, गुरूवारी दुपारपासूनच महालक्ष्मीची आरास सजविण्यात महिला मग्न होत्या. महालक्ष्मीचा सण तीन दिवस असतो. या निमित्त बाजारपेठ सजली असून, वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी बाजारात आहे. विशेष करून ऐन महालक्ष्मीच्या सणासुदीत फुलांच्या किंमतींनी हनुमान उडी घेतली असून, केवड्याच्या पानाचे महत्व असल्याने त्याची किंमत वाढली आहे. निशिगंध, जाई-जुई तसेच लिली, झेंडू फुलांचे हार देखील शंभररूपयांपेक्षा जास्त किंमतीत विक्री होत आहेत.
यंदा पाऊस लांबल्याने गणेश उत्सवावरच दुष्काळाची छाया होती, परंतु गणपती आगमना नंतर मध्यम स्वरूपाचा का होईना, पाऊस पडल्याने भक्तांमध्ये थोडा-बहूत उत्साह दिसून आला. महालक्ष्मी बसविण्याचे मुहूर्त हे सायंकाळी सहा वाजेनंतर होते. त्यामुळे अनेकांनी मुहूर्त साधला. लक्ष्मीच्या आगमना निमित्त घरोघरी सडा-रांगोळी काढून स्वागताची तयारी करण्यात आली. शुक्रवारी महालक्ष्मीचे महाभोजन असल्याने अनेकांनी तयार मिठाईसह बाजारात आलेल्या १६ भाज्या खरेदी केल्या. काही जणांकडे सकाळी, दुपारी आणि सायंकाळी अशा तिन्ही प्रहारात महालक्ष्मीच्या जेवणाची परंपरा आहे. गणेश उत्सवातच येणारा हा सण देखील दसरा-दिवाळी एवढा महत्वाचा समजला जातो.
एकीकडे विघ्नहर्त्याची सर्वत्र उत्साही वातावरणात स्थापना झाली आहे. असे असतांनाच ऐन सणासुदीत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांत वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. दर एक , दोन तासांनी वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकार घडत असल्याने वीज वितरण कंपनीसह लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी सामान्यांमधून होत आहे.