‘तान्हाजी’ चित्रपटात झळकला चांधई टेपली येथील मावळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 01:11 AM2020-01-19T01:11:58+5:302020-01-19T01:12:50+5:30
देशात एका आठवड्यात १०० कोटींचा व्यवसाय मिळविणाऱ्या ‘तान्हाजी’ या हिंदी चित्रपटात चुलत्याची भूमिका करणारा सिनेअभिनेता भोकरदन तालुक्यातील चांदई ठोंबरी या गावातील आहे.
फकिरा देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : देशात एका आठवड्यात १०० कोटींचा व्यवसाय मिळविणाऱ्या ‘तान्हाजी’ या हिंदी चित्रपटात चुलत्याची भूमिका करणारा सिनेअभिनेता भोकरदन तालुक्यातील चांदई ठोंबरी या गावातील आहे. त्याचे मराठी नाटक, मराठी सिनेमातून चक्क हिंदी चित्रपटात पदार्पण झाले आहे. कैलास वाघमारे असे या अभिनेत्याचे नाव आहे.
भोकरदन तालुक्यातील राजूर जवळ असलेल्या चांदई ठोंबरी येथील एका शेतकरी कुटुंबात कैलास वाघमारे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रामभाऊ वाघमारे हे शेती करतात. त्यांना चार मुले आहेत. यात तीन मुले व एक मुलगी आहे. यातील कैलास हा सर्वात लहान असून, त्यांचे दोन भाऊ पारंपरिक पद्धतीने शेती करतात. कैलास वाघमारे यांचे शिक्षण सातवीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर चांदई एक्को येथील विनायक विद्यालयात आठवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतले. पुढे बारावीपर्यंतचे शिक्षण राजूर येथील मोरेश्वर महाविद्यालयात घेऊन पुढील शिक्षण मत्स्योदरी महाविद्यालय जालना येथे घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली. तेथील विद्यापीठात एम. ए. मराठी व एम. ए. नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतले.
कैलास वाघमारे हे शालेय जीवनात असतानाच नाटक करायचे. त्यामुळे त्यांना शालेय जीवनातच अनेक नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. कालांतराने त्यांनी मराठी सिनेसृष्टीत प्रवेश मिळविला. यात मराठीत मनातल्या उन्हात, हाफ तिकीट, किस्से बाजी, सोम शो, ड्राय डे, बाबा, मंडळ आभारी आहे, घोडा या चित्रपटांत काम केले. आता ‘तान्हाजी’ हा सिनेमा चांगलाच हिट झाला आहे. शिवाय मी केलेल्या भूमिका सुद्धा असंख्य चाहत्यांना आवडली आहे. त्यामुळे आता मी भारावून गेलो आहे. मी सिनेसृष्टीत असल्यामुळे मागील आठ ते दहा वर्षांपासून मुंबई येथे राहत होतो. मात्र, वर्षातून तीन ते चार वेळा चांदई ठोंबरी येऊन मातीशी नाते कायम ठेवत असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.
सिंधाना, जाधव यांच्यामुळे संधी
याबाबत कैलास वाघमारे म्हणाले, कास्टिंग दिग्दर्शक विकी सिंधाना व विजय जाधव यांच्यामुळे ‘तान्हाजी’ या हिंदी चित्रपटात मला भूमिका करण्याची संधी मिळाली. सुरूवातीला जेव्हा या सिनेमाचे संचालक ओम राऊत यांच्या समोर घेऊन गेले तेव्हा ‘तान्हाजी’ मध्ये कोठे तरी छोटासा रोल करण्यासाठी नेले होते. मात्र, ओम राऊत यांच्या सोबत एक दोन तास चर्चा झाली. त्यांनी मला अचानक चुलत्याची मोठी भूमिका करण्याची संधी दिली
आहे.
शालेय जीवनात असताना राजूरच्या यात्रेत अजय देवगण यांचा ‘फूल और काँटे’ हा सिनेमा टूरिंग टॉकीजमध्ये खाली जमिनीवर बसून बघितला होता. यावेळी आपल्याला या पडद्यावर काम करण्याची संधी मिळेल, असा विचारही केला नव्हता. मात्र ‘तान्हाजी’मुळे ते शक्य झाले आहे. सिनेअभिनेता सैफ अली खान, सिनेअभिनेता अजय देवगण यांनी मी चुलत्याची भूमिका चांगली केल्याबद्दल पाठीवरून हात फिरविला. हा जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण होता.
- कैलास वाघमारे, अभिनेता