नगरपालिकेच्या कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहाच्या पुनर्निर्माणासाठी सरसावले कलाकार
By विजय मुंडे | Published: April 3, 2023 07:29 PM2023-04-03T19:29:16+5:302023-04-03T19:30:08+5:30
नगरपालिकेने १९८३ साली कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह बांधले.
जालना : येथील नगरपालिकेच्या कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे. या नाट्यगृहाच्या पुनर्निर्माणासाठी शहरातील कलाकार सरसावले आहेत. नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचा निर्णय रविवारी संस्कार प्रबोधिनी शाळेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
नगरपालिकेने १९८३ साली कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह बांधले. ७५० प्रेक्षागृह क्षमतेचे नाट्यगृह ही शहरवासीयांच्या चर्चेचा विषय ठरली होती. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, सभा यासाठी नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली. मात्र, आज या नाट्यगृहाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. नाट्यगृहातील खुर्च्या तुटल्या आहेत. त्यामुळे आसनव्यवस्थेचा खोळंबा झाला आहे. तसेच इतरही सोयी-सुविधांचा बोजवारा उडाल्याने नाट्यगृहात कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याची परिस्थिती नाही. नाट्यगृहाची हीच परिस्थिती बदलून त्याच्या नूतनीकरणासाठी कलाकार सरसावले आहेत.
यावेळी बैठकीस विनोद जैतमहाल, सुरेश केसापुरकर, दिनेश संन्यासी, सतीश लिंगडे, सुमित शर्मा, मुकुंद दुसे, मिलिंद दुसे, सखाराम गुरू, सुनील शर्मा, अविनाश भंडे, ओंकार बिन्नीवाले, सुलभा कुलकर्णी, दीपाली बिन्नीवाले आदींसह इतरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
गांधीगिरीने होणार आंदोलनाची सुरुवात
रविवारी झालेल्या बैठकीत सर्वप्रथम नाट्यगृहासमोरील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या पुतळ्याची साफसफाई करून गांधीगिरी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन नाट्यगृहाच्या डागडुजीसाठी अल्टिमेटम देण्यात येणार आहे. लवकरात लवकर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामास सुरुवात न झाल्यास सर्व कलाकार व नाट्यप्रेमींच्या वतीने रस्त्यावर उतरून भीक मागो आंदोलन करतील, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.