Video: घटस्फोट मिळताच न्यायालयातच महिलेचा पती, सासऱ्यांच्या कानाखाली 'स्फोट'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 06:45 PM2023-01-31T18:45:16+5:302023-01-31T18:55:27+5:30
महिलेने पळत जाऊन सासरे, पतीला मारहाण केल्यानंतर दोन्ही कडील नातेवाईक आपसात भिडले
- फकिरा देशमुख
भोकरदन ( जालना) : घटस्फोट मिळाल्यानंतर महिलेने सासऱ्याच्या व पतीच्या कानाखाली मारल्यामुळे न्यायालयाच्या आवारात दोन गटात फिल्मी स्टाईल हाणामारी झाल्याची घटना आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी न्यालयाच्या आदेशाने पोलिसांनी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची माहिती अशी की, तालुक्यातील पोखरी येथील सुवर्णा सुभाष लुटे हिचा विवाह आडगाव भोंबे ( ता भोकरदन ) येथील शुभम विनायक साळवे यांच्या सोबत झाला होता. मात्र, आपसात पटत नसल्याने सुवर्णा काही दिवसांपासून माहेरी राहत होती. त्यानंतर नातेवाईकांनी एकत्र येऊन बैठक घेत दोघांनी फारकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुषंगाने दोन्हीकडील नातेवाईक आज दुपारी भोकरदन न्यायालयाच्या परिसरात आले. वकिलांकडून नोटरीकरून घेत दोघांनी फारकत घेतली. शुभम याने सुवर्णास ठरल्याप्रमाणे 4 लाख रुपये दिले. हे सर्व शांततेत पार पडले.
जालना: घटस्फोट मिळताच महिलेने पती, सासऱ्यांच्या कानाखाली मारली, भोकरदन न्यायालयाच्या आवारात दोन गटात जोरदार मारामारीhttps://t.co/YhthF5cgBfpic.twitter.com/Y818o70MCy
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) January 31, 2023
मात्र, अचानक सुवर्णाने पळत जाऊन सासरा विनायक साळवे यांच्या कानशिळात लगावली. हे दृश्य पाहताच शुभम धावून आला असता त्यालाही सुवर्णाने मारहाण केली. त्यानंतर दोन्ही कडील मंडळी एकमेकांवर तुटून पडले. आरडाओरडा सुरू झाल्याने न्यायाधीशांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. पोलिस कर्मचारी गोपाळ सतवन, संतोष गायकवाड यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लाठीचार्ज केला. पोलिस उपनिरीक्षक युवराज पाडळे यांनी दोन्ही गटांना शांत केले. या प्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलिस कर्मचारी गोपाल सतवन यांच्या तक्रारी वरून विनायक किसन साळवे, सुवर्णा सुभाष लुटे-साळवे, शुभम विनायक साळवे, विलास माणिक साळवे, पंडित किसन साळवे, शिवाजी भोंबे, सर्जेराव पाटील तांगडे, निवृत्ती सुभाष लुटे, गजानन वामन जगताप, देविदास सुरडकर यांच्या विरुध्द भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.