शॉर्टसर्किटमुळे स्वप्नांची राख; पूर्ण वाढलेला ११ हेक्टर ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 01:56 PM2021-10-09T13:56:58+5:302021-10-09T14:00:24+5:30
Fire in farm field : आगीने रौद्ररूप धारण करून परिसरातील ४ ते ५ गटातील जवळपास ११.७२ हेक्टर उसाला आपल्या कवेत घेतले.
टेंभुर्णी (जि.जालना) : जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथे शुक्रवारी शॉर्टसर्किटमुळे उसाला आग (11 hectares of fully grown sugarcane burn ) लागली. या आगीत कुंभारझरी शिवारातील १४ शेतकऱ्यांचा ११.७२ हेक्टर ऊस जळून खाक झाला आहे. दरम्यान, वेळोवेळी सांगूनही विजेची तारे सरळ न करणाऱ्या वीज वितरण प्रशासनाविरुद्ध शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.
शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास येथील गट क. ९२ मधील शेतकरी विनायक चव्हाण यांच्या उसाला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण करून परिसरातील ४ ते ५ गटातील जवळपास ११.७२ हेक्टर उसाला आपल्या कवेत घेतले. यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी या शेतांकडे आग नियंत्रित आणण्यासाठी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नानंतर गावकऱ्यांना ही आग नियंत्रित आणण्यात यश आले. या आगीत जवळपास १ हजार ५०० टनांपेक्षा अधिक ऊस जळून खाक झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून, त्यात ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अद्याप परिसरात कुठेही साखर कारखाने सुरू नसल्याने या संपूर्ण उसाचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागणार आहे. दरम्यान, या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
तीन वर्षांपूर्वीही लागली होती आग
तीन वर्षांपूर्वीही याच ठिकाणी विजेच्या शॉर्टसर्किटमुळे उसाला लागलेल्या आगीत ६० ते ७० एकर ऊस जळून खाक झाला होता. तेव्हा ऊस जळूनही वीज वितरणाने या प्रकरणाला गांभीर्याने न घेतल्याने पुन्हा ही दुर्घटना घडली, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी बोलून दाखवित आहे.