मुली-महिलांसाठी अस्मिता योजना वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 01:11 AM2018-10-09T01:11:21+5:302018-10-09T01:14:03+5:30
सरकारने मुली महिलांना माफक दरात पॅड उपलब्ध होण्यासाठी अस्मिता योजना सुरू केली. याचा आज जिल्ह्यातील तब्बल ७ हजार महिलांना लाभ झाला आहे.
दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मुली महिलांमध्ये पॅड वापरण्यासंबंधी असलेले गैरसमजावर पॅडमॅन चित्रपटाने प्रकाश टाकण्याचे काम केले. पॅड न वापरण्यामुळे महामारी सारख्या महाभयंकर आजार होऊन महिलांना प्राण गमवावे लागतात. या चित्रपटातून अनेक महिलांनी प्रेरणा घेत याचा वापर करण्यास सुरुवात केली. सरकारने मुली महिलांना माफक दरात पॅड उपलब्ध होण्यासाठी अस्मिता योजना सुरू केली. याचा आज जिल्ह्यातील तब्बल ७ हजार महिलांना लाभ झाला आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यासाठी ही योजना वरदान ठरताना दिसत आहे.
राज्यातील ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुली तसेच जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ या वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी तसेच महिला व मुलींना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याकरिता राज्यात अस्मिता योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना २४० मिमी. आकाराची सॅनिटरी नॅपकिन २४ रुपये तसेच २८० मिमी आकाराची सॅनिटरी नॅपकिन २९ रुपयाला देण्यात येत आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ वयोगटांमधील किशोरवयीन मुलींसाठी अनुदान तत्वावर केवळ आठ नॅपकिनचे पॉकेट पाच रूपयाला दिले जात आहे. याचा पुरवठा करण्याची जबाबदारी बचतगटांना देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यासाठी सॅनिटरी नॅपकीनची २९ हजार ८२० पाकिटे आली असून, ७ हजार महिलांना पॅडचे वाटप करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींमध्ये मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेबाबतची जागरुकता कमी बघावयास मिळते. वैयक्तिक स्वच्छतेबाबत जाणीव मोठ्या प्रमाणात यावी, यासाठी अस्मिता योजनेद्वारे सरकार मुलींना व महिलांना स्वस्त दरात पॅड देत आहेत.
जिल्हा परिषद शाळेतील मुलींना सॅनिटरी नॅपकीन ५ रुपयात दिली जात आहे. त्यामध्ये आठ 'पॅड' आहेत. जिल्हा परिषद शाळेतील ११ ते १९ वयोगटातील मुलींसाठी ही योजना प्राथमिक शिक्षण विभागाच्या मदतीने राबविण्यात येत आहे. प्रत्येक किशोरवयीन मुलींने नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्राच्या मदतीने अस्मिता योजनेत नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी झालेल्या मुलींनाच अस्मिता कार्ड दिले जाईल. अस्मिता कार्ड शाळांमध्ये उपलब्ध करुन दिले जात आहे.
विद्यार्थिनी कार्डबाबत अनभिज्ञ
जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ या वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी ही योजना अनुदान तत्त्वावर राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हा परिषद शाळांमधील मुलींना अस्मिता कार्ड देण्यात आले आहे. मात्र काही विद्यार्थिनी या कार्डबाबत पूर्णत: अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागात आजही गैरसमज
मासिक पाळीबाबत आजही ग्रामीण भागात अनेक गैरसमज आहेत. महिलांना मासिक पाळी आल्यानंतर घराच्या बाहेर ठेवले जाते. पॅड महाग असल्यामुळे अनेक महिला पॅडऐवजी कापड्याचा वापर करतात. त्यामुळे त्यांना त्वचेचे रोग होण्याची शक्यता आहे. ही योजना ग्रामीण भागातील महिला व मुलींना लाभदायक असली तरी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. विविध संघटनांनी महिलांमधील गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
जिल्ह्यातील सर्वच गावांमधील शालेय विद्यार्थिनी, महिलांना वैयक्तिक स्वच्छतेसाठी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्याची जबाबदारी महिला बचत गटांना देण्यात आली आहे. यासाठी या महिला बचत गटांना अस्मिता अॅपचा वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात जवळपास ७१० नोंदणीकृत बचत गटामार्फेत ही सेवा देण्यात येत आहे. यातील ३६२ गटांनी रिचार्ज केले असून, ते सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करीत आहेत. या महिलांना मानधनही दिले जात असून, यामुळे ७ हजारांपेक्षा जास्त महिलांना रोजगार मिळाला आहे.
अस्मिता योजनेत पात्र लाभार्थी मुलींची नोंदणी करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १९ हजार १२२ मुलींची नोंदणी करण्यात आली आहे. यातील १६ हजार १२७ मुलींना अस्मिता कार्ड वाटप करण्यात आले आहे.
‘पॅडमॅन’चा परिणाम
अभिनेता अक्षय कुमारने पॅडमॅन याा चित्रपटामधून सॅनिटरी नॅपकिन विषयी जनजागृती केली. या चित्रपटामुळे ग्रामीण भागातील महिलांनाही सॅनिटरी नॅपकिनची उपयोगिता समजली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलाही या सॅनिटरी नॅपकीनचा वापर करताना दिसत आहे.