अट्टल चोरटा जेरबंद; सराफाकडून दागिने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 01:11 AM2019-08-25T01:11:09+5:302019-08-25T01:11:41+5:30
अनेक चोऱ्यांमध्ये हात असलेल्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील नवीन मोंढा भागातून जेरबंद केले.
जालना : अनेक चोऱ्यांमध्ये हात असलेल्या अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील नवीन मोंढा भागातून जेरबंद केले. चोराने विक्री केलेले एक लाख ४७०० रूपयांचे दागिने देऊळगाव राजा येथील सराफाकडून जप्त करण्यात आले. ही कारवाई गुरूवारी रात्री करण्यात आली असून, आरोपीला सदरबाजार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अशोक शामराव सुरासे (रा. नवीन मोंढा जालना) असे आरोपीचे नाव आहे. जालना शहरातील अनेक घरफोड्यांमध्ये हात असलेला अशोक सुरासे हा शहरात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने सुरासे याचा मागमूस काढून गुरूवारी रात्री जालना शहरातील नवीन मोंढा भागातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गत अडीच महिन्यांपूर्वी नवीन जालना भागातील सकलेचा नगरमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरीतील दागिने देऊळगाव राजा येथील एका सराफा व्यापाºयाला विकल्याचे त्याने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देऊळगाव राजा येथील सराफाला गाठले. त्याची चौकशी करून त्याच्याकडील १ लाख ४७०० रूपये किंमतीचे सोन्याचे ३४ ग्रॅम ९०० मिली दागिने जप्त केले. सुरासे याच्याकडून चोरीच्या इतर घटनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर, दुर्गेश राजपूत, सॅम्युअल कांबळे, कैलास कुरेवाड, प्रशांत देशमुख, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, पोकॉ सचिन चौधरी, विलास चेके यांनी केली.