मुख्य शाखेतून पैसे घेऊन जाणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांवर हल्ला; १५ लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 01:52 PM2021-11-26T13:52:22+5:302021-11-26T13:53:01+5:30
दुचाकीवरील चोरट्यांनी कर्मचाऱ्यांवर अचानक हल्ला केला.
जालना : जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेतून गोलापांगरी येथील शाखेसाठी १५ लाख रुपयांची रक्कम दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना अडवून मारहाण केल्याची घटना आज दुपारी साडेबारा दरम्यान घडली. चोरट्यांनी कर्मचाऱ्यांच्या जवळील १५ लाखांची रोकड लंपास केली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.
जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेतून गोलापांगरी येथील शाखेसाठी आज पंधरा लाख रुपयांची रक्कम दोन कर्मचाऱ्यांमार्फत दुचाकीवरून पाठविण्यात आली होती. रक्कम घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची दुचाकी गोलापांगरीजवळील एका इंग्रजी शाळेजवळ आली तेव्हाच दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी अडवून मारहाण केली.
अचानक झालेल्या हल्ल्याने कर्मचारी चोरट्यांचा प्रतिकार करण्यास कमी पडले. चोरट्यांनी शिताफीने त्यांच्याकडील १५ लाख रुपये असलेल्या पैशाची बॅग घेऊन पोबारा केला. माहिती मिळताच तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.