शेतात शौचास बसण्यास विरोधातून मायलेकाचा खून; बाप,मुलगा गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 10:36 AM2022-07-16T10:36:01+5:302022-07-16T10:39:15+5:30
किरकोळ कारणावरून वाद वाढला आणि कुटुंबावर हल्ला करण्यात आला
जालना : शौचालयास बसण्यास विरोध केल्याच्या कारणावरून मायलेकाचा चाकूचे वार करून खून करण्यात आल्याची घटना जालना तालुक्यातील एरंडवडगाव (अचानक तांडा) येथे शुक्रवारी रात्री घडली. यात दोघे जण ठार झाले असून, दोघे जण गंभीर जखमी आहे. सुमनबाई देविलाल सिल्लोडे (४५), मंगेश देविलाल सिल्लोडे (२०) अशी मयतांची नावे आहेत. तर योगेश देविलाल सिल्लोडे (१८), देविलाल सिल्लोडे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
एरंडवडगाव शिवारात असलेल्या अचानक तांडा येथे देवीलाल सिल्लोडे यांची गावाजवळच शेती आहे. या शेतात गावातील शिंदे कुटुंबातील काही मुले सराईत चोरटे असून, ते रात्री चोऱ्या करून आल्यानंतर लपून बसतात. यावरून शिंदे आणि सिल्लोडे यांच्या नेहमी वाद होत होते. शुक्रवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास काही महिला सिल्लोडे यांच्या शेतात शौचालयास बसल्या होत्या. त्याचवेळी देविलाल सिल्लोडे हे गावातून घराकडे येत होते. त्यांनी महिलांना शौचालयास बसण्यास विरोध केला. त्यावरूनच वादा-वादी झाली. त्याचवेळी काही जणांनी देविलाल सिल्लोडे यांना मारहाण केली.
देविलाल सिल्लोडे यांनी मुलांना आवाज दिला. तेव्हा दोन्ही मुले मंगेश, योगेश व त्यांची आई सुमनबाई यांनी धाव घेतली. त्यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता, चौघांनी मंगेशच्या पोटात चाकूने वार केले. त्यानंतर सूमनबाई यांच्याही पोटात चाकूने वार करून त्यांना जखमी करण्यात आले. योगेशच्या पाठातही चाकूचा वार करण्यात आला. तर देविलाल यांना बेदम मारहाण करण्यात आली.
या सर्वांना सुरूवातील नेर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून जालना येथे रेफर करण्यात आले. डॉक्टरांनी मंगेश व सूमनबाई यांना तपासून मयत घोषित केले. तर देविलाल सिल्लोडे व योगेश सिल्लोडे यांच्यावर जालना येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे.