जालन्यात चोरट्यांचा बँक फोडण्याचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 03:33 PM2019-01-17T15:33:59+5:302019-01-17T15:35:20+5:30
बँकेची तिजोरी मजबूत व सुरक्षित असल्याने चोरट्यांना काहीच हाती आले नाही.
जालना : शहरातील चंदनझिरा येथील मंठा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेत बुधवारी रात्री चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, बँकेत काहीच न मिळाल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले.
नेहमीप्रमाणे बँकची कामे उरकून बँक कर्मचारी बुधवारी सायंकाळी बँक बंद करुन निघून गेले. मध्यरात्री बँकेचे शटर उचकटून चोरट्यांनी बँकेत प्रवेश करत सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्याचा प्रयत्न केला. बँकेची तिजोरी मजबूत व सुरक्षित असल्याने चोरट्यांना काहीच हाती आले नाही. त्यानंतर त्यांनी बँक व्यवस्थापकाच्या कॅबेनची झडती घेतली. मात्र, येथेही त्यांना काहीच मिळाले नाही. चोरट्यांनी जातांना कॅबेनमध्ये असलेले डी. व्ही. आर. चोरून नेला. आज सकाळी घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला.