अवैध वाळूचा ट्रक अंगावर घालण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:44 AM2018-12-25T00:44:20+5:302018-12-25T00:44:52+5:30
बामखेडा येथील पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा करुन वाहतूक करीत असलेले वाहन बामखेडा येथील ग्रामस्थांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
केदारखेडा : ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बामखेडा येथील पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा करुन वाहतूक करीत असलेले वाहन बामखेडा येथील ग्रामस्थांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.
संतप्त ग्रामस्थांनी अवैध वाळूचा उपसा करुन वाहतूक करणाऱ्या हायवा क्र.एम.एच.२० ई.जी.७१४४, ट्रक क्र,एम.एच. २० सी.टी.२३३३ आणि विना पासिंग जेसीबी महसूल व पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. यावेळी ग्रामस्थांचा पोलीस व महसूल विभागाच्या कर्मचा-यांसोबत शाब्दिक चकमक झाली.
यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. परंतु अवैध वाळू उपशा वर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. या परिसरातील पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा जेसीबी यंञाद्वारे रात्रंदिवस सुरु आहे. याकडे महसूल आणि पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. दिवसाढवळ्या महसूल आणि पोलीस विभागाच्या डोळयासमोर त्यांच्या नाकावर टिच्चून वाळूचा उपसा आणि वाहतूक सुरू असते.
असे असतानाही कारवाई होत नसल्याने वाळू माफियांची चलती आहे. यातूनच सोमवारी सकाळी बामखेडा पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा करुन वाहतूक करीत असलेल्या या वाहन चालकांनी बामखेडा येथील ग्रामस्थांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला. सदरील व्यक्ती आपल्या मुलांना घेऊन दुचाकीवर शाळेत सोडण्यासाठी केदारखेडा येथे येत होता.
संबंधित प्रकारामुळे बामखेडा येथील ग्रामस्थ संतप्त झाले, त्यांनी वाळूची वाहतूक करीत असलेली दोन वाहने व जेसीबी पकडले. या प्रसंगी नायब तहसिलदार के.टी. तांगडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे यांनी मध्यस्थी केली.