मोडकळीस आलेल्या घरात नरबळीचा प्रयत्न, शेजाऱ्यांनी धाव घेतल्याने बचावली महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:32 AM2021-09-27T04:32:31+5:302021-09-27T04:32:31+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील मांत्रिक महिलेलाही घेतले ताब्यात, पोलिसांकडून कसून चौकशी लोकमत न्यूज नेटवर्क टेंभुर्णी : नरबळीसाठी पती हळदी-कुंकू, उदबत्ती लावत ...
बुलडाणा जिल्ह्यातील मांत्रिक महिलेलाही घेतले ताब्यात, पोलिसांकडून कसून चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : नरबळीसाठी पती हळदी-कुंकू, उदबत्ती लावत असल्याने महिलेने आरडाओरड केली आणि मुलासह शेजारील नागरिक धावून गेले. त्यामुळे या महिलेची सुटका झाल्याचा प्रकार डोणगाव (ता. जाफराबाद) येथे बुधवारी रात्री घडला. पोलिसांनी महिलेचा पती, मांत्रिक महिला आणि इतर एकाला जेरबंद केले आहे.
सीमा संतोष पिंपळे असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. पती संतोष साबळे याने बुधवारी रात्री, गुप्त धनासाठी तुझा नरबळी देतो, असे म्हणताच त्यांनी विरोध केला. पती मारहाण करीत असल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यावेळी मुलासह शेजारील नागरिक धावून आल्याने सीमा पिंपळे यांची सुटका केली. त्यांनी तात्काळ वडिलांना बोलावून घेतले. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी टेंभुर्णी ठाण्यात तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करून संतोष पिंपळे, जीवन पिंपळे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली. त्या दोघांकडील चौकशीनंतर उंबरखेड (जि. बुलडाणा) येथील एका महिलेला ताब्यात घेतले असून, तिच्याकडे चौकशी सुरू असल्याचे सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी इंदल बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील सपोनि रवींद्र ठाकरे, पोउपनि दिंडे, किरण निर्मळ, पंडित गवळी, गणेश पवार, राजेंद्र भुतेकर, छाया निकम, सागर शिवरकर, महेश वैद्य, त्र्यंबक सातपुते यांच्या पथकाने केली.
चौकट
आमिषाला बळी पडू नका
जादूटोणासारख्या भ्रामक कल्पना आहेत. अशा प्रकारांमुळे समाजाची मोठी हानी झाली आहे. याबाबत प्रशासनही वेळोवेळी जनजागृती करीत आहे. परंतु, काही लोक अशा भ्रामक कल्पनांच्या आमिषाला बळी पडून स्वत:चे आणि कुटुंबाचे नुकसान करून घेत आहेत. अशा गोष्टींपासून नागरिकांनी दूर राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.