बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 12:31 AM2020-03-05T00:31:49+5:302020-03-05T00:32:00+5:30
जिल्हा बँकेच्या शाखेतील तिजोरी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हसनाबाद : शहरातील जिल्हा बँकेच्या शाखेतील तिजोरी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. ही घटना बुधवारी पहाटे समोर आली. विशेष म्हणजे, त्या तिजोरीत तब्बल २३ लाख ९० हजार २०० रूपयांची रक्कम होती.
हसनाबाद शहरातील हसनाबाद- भोकरदन मार्गावर जालना जिल्हा बँकेची शाखा आहे. शाखा व्यवस्थापक रईस काद्री हे बुधवारी सकाळी बँकेत आले असता मागील शटर उचकटलेले दिसले. त्यांनी ग्रामस्थ, पोलिसांना माहिती दिली. पोलिसांसमक्ष मुख्य शटर उघडण्यात आले.
फौजदार गुलाब पठाण यांनी घटनेचा पंचनामा करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर, सपोनि एम. एन. शेळके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तिजोरी उघडून पाहिल्यानंतर चोरट्यांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिजोरी न फुटल्याने बँकेतून काढता पाय घेतला. त्यामुळे तिजोरीतील तब्बल २३ लाख ९० हजार २०० रूपये सुरक्षित असल्याचे दिसून आले.
या प्रकरणी शाखा व्यवस्थापक रईस काद्री यांच्या तक्रारीवरून हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सपोनि एम.एन. शेळके हे करीत आहेत. चोरट्यांच्या शोधार्थ पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
चोरटे सीसीटीव्हीत कैद
हसनाबाद जिल्हा बँकेतून बुधवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास बाहेर पडणारे दोन चोरटे एका दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेणे सुरू केले आहे.
एकच कर्मचारी
हसनाबाद शाखेतून शासकीय अनुदान वाटपासह इतर व्यवहार केले जातात. जवळपास २० हजार ग्राहक आहेत. मात्र, या कामांसाठी केवळ एकच कर्मचारी आहे. घटनेनंतर बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली.