चोरीच्या धनादेशावर बनावट स्वाक्षऱ्या करुन ३३ लाख वटविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 05:58 PM2019-08-20T17:58:53+5:302019-08-20T18:04:12+5:30
जालना जिल्हा परिषदेच्या लेखा अधिकाऱ्याच्या दालनातून सहा धनादेशाची चोरी
जालना : जालना जिल्हा परिषदेच्या लेखा अधिकाऱ्याच्या दालनातून सहा धनादेशाची चोरुन करुन त्यावर मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन ३३ लाख ०८ हजार ६२४ रुपये वटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी मनोज निवृत्त गायकवाड, सुनिल सुधाकर रत्नपारखे यांच्याविरुध्द कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने जिल्हा परिषद कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
१३ आॅगस्ट २०१९ रोजी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात रोखपाल सिध्दार्थ पटेकर, विजय खापरे, किशोर शेजळवळकर हे नेहमी प्रमाणे काम करीत होते. याचवेळी विजय खापरे व सिध्दार्थ पटेकर यांनी जिल्हा परिषदेच्या उप कर योजना व हस्तांतरीत योजनेचे धनादेश पाहिले असता, त्यांना सहा नसल्याचे लक्षात आले. धनादेश नसल्याचे कळाल्यानंतर त्यांनी याबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांना सांगितले. त्यांनी सदर धनादेशाचा गैरवापर टाळण्यासाठी स्टेट बँक आॅफ इंडियाला स्टप पेमेंन्ट बाबत पत्र दिले. तसेच कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांकडे धनादेशांबाबत चौकशी केली. परंतु, कोणाकडेच ते धनादेश मिळाले नाहीत.
१९ आॅगस्ट रोजी बँकेच्या कर्मचाऱ्याने वित्त विभागाला माहिती दिली की, मनोज गायकवाड व सुनिल रत्नपारखे यांच्या नावे ३३ लाख ०८ हजार ६२४ रुपयांचे धनादेश सादर केले आहेत. त्यानंतर वित्त अधिकाऱ्यांनी सदर बँकेत जाऊन धनादेशाची पाहाणी केली असता, सदर धनादेशावर लिहिलेला मचकुर हा वित्त विभागातील कर्मचाऱ्यांनी लिहिलेला नव्हता. तसेच दोन्ही धनादेशावर पदनाम दशर्विणारा शिक्का व मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांची बनावट स्वाक्षरी असल्याचे आढळून आले. याप्रकरणी उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण धोंडीराम निर्मळ यांच्या फिर्यादीवरुन मनोज निवृत्ती गायकवाड व सुनिल सुधारकर रत्नपारखे यांच्या विरुध्द कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि. मोरे हे करीत आहेत.