पिस्तूल विक्रेत्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:27 AM2019-12-16T00:27:07+5:302019-12-16T00:27:24+5:30

जिल्ह्यात अवैधरीत्या पिस्तूल विक्री करणाऱ्यांचे जाळे उध्दवस्त करण्यासाठी पोलीस दल प्रयत्नशील असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी दिली.

Attempts to destroy the nets of pistol dealers | पिस्तूल विक्रेत्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न

पिस्तूल विक्रेत्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दरोडा प्रतिबंधक पथकाने अंबड येथे कारवाई करून एक गावठी पिस्तूल जप्त केले. जिल्ह्यात आजवर आठ पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत. पिस्तूल कोठून आणल्या जातात याचा शोध सुरू आहे. जिल्ह्यात अवैधरीत्या पिस्तूल विक्री करणाऱ्यांचे जाळे उध्दवस्त करण्यासाठी पोलीस दल प्रयत्नशील असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी दिली.
अंबड येथील अक्षय भिमराव शिंगाडे (रा. विकास नगर, अंबड) याच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती दरोडा प्रतिबंधक पथकाचे (एडीएस) प्रमुख पोनि यशवंत जाधव यांना मिळाली होती. या माहितीवरून पोनि यशवंत जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी सकाळी अंबड येथे सापळा रचला. अक्षय शिंगाडे हा पिस्तूल घेऊन घरून बसस्थानकाकडे जात होता. पोलिसांनी अंबड येथील बसस्थानकाजवळील एका ज्युस सेंटर समोर कारवाई करून अक्षय शिंगाडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीत असलेली ४० हजार रूपये किंमतीची गावठी पिस्तूल जप्त केली. या प्रकरणी पोहेकॉ नंदू खंदारे यांच्या तक्रारीवरून अक्षय शिंगाडे विरूध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोनि यशवंत जाधव, पोहेकॉ नंदू खंदारे, पोहेकॉ ज्ञानदेव नागरे, पोना किरण चव्हाण, गजानन भोसले, पोकॉ सचिन आर्य, नाथा दिवटे आदींच्या पथकाने केली.
दरम्यान, पिस्तूल प्रकरणातील पुढील तपासाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
युवकाचे अडत दुकान
दरोडा प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतलेल्या अक्षय शिंगाडे याचे आडत दुकान आहे. त्यामुळे शिंगाडे याने पिस्तूल कोणत्या कारणासाठी घेतली आणि ती कोणाकडून विकत घेतली? याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
परतूर प्रकरणात मागविला अहवाल
परतूर येथील एका अल्पवयीन मुलीने मुंबई येथे जाऊन उपोषण केले होते. त्यामुळे आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आणि त्याची कागदपत्रे आल्यानंतर परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात उपविभागीय अधिका-यांकडून परतूर पोलीस ठाण्याचा अहवाल मागविला असून, या प्रकरणात कोणी दोषी असेल तर कारवाई केली जाईल, असे एस. चैतन्य यांनी सांगितले.
..तर खात्यांतर्गत चौकशी
पिस्तूल विक्री प्रकरणात अटक केलेल्या वनारसे याचे वडील पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांना मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी कोणी तक्रारी केल्याचे दिसून येत नाही. पिस्तूल विक्री प्रकरणात त्यांचा मुलगा अटकेत असून, त्याची चौकशी सुरू आहे. गरज पडली तर त्याच्या वडिलांची खात्यांतर्गत चौकशी केली जाईल, असे एस. चैतन्य यांनी सांगितले.
पोलिसांचा तपास : परराज्याशी कनेक्शन्
जालना जिल्ह्यात सापडलेल्या पिस्तूल विक्रेत्यांचे जाळे जालना ते मध्यप्रदेश, राजस्थानपर्यंत असण्याची शक्यता आहे. आम्ही त्या दृष्टीने तपास करीत आहोत. पिस्तूल विक्री प्रकरणात आजवर दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू असून, पिस्तूल विक्रीतील धागेदोरे हाती लागतील. गरज पडली तर इतर राज्यातील पोलिसांची मदत घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे एस. चैतन्य यांनी सांगितले.

Web Title: Attempts to destroy the nets of pistol dealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.