‘यमन, मालकंस’च्या सादरीकरणाने श्रोते मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:40 AM2018-12-24T00:40:57+5:302018-12-24T00:41:18+5:30
गायनाचार्य स्व.गोविंदराव जळगावकर स्मृती संगीत समारोह तथा दत्तजयंती संगीत उत्सवास शनिवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : गायनाचार्य स्व.गोविंदराव जळगावकर स्मृती संगीत समारोह तथा दत्तजयंती संगीत उत्सवास शनिवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. पं. गिरीश गोसावी, पं. संजय गरुड, वृषाली देशमुख, मिलिंद गोसावी, निरंजन भालेराव यांच्या सुरेल आवाजात या उत्सवास सुरुवात झाली. अभिजात संगीताचा वारसा जपणाऱ्या या संगीतोत्सवात राग यमन, रागेश्री, मालकंस, किरवानी आणि कलाश्रीच्या सादरीकरणाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.
अंबड येथे समर्थ सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित ९५ व्या दत्त जयंती संगीतोत्सवाच्या पहिल्या संगीत सभेची सुरुवात औरंगाबादच्या निरंजन भालेराव यांच्या बासरीवादनाने झाली. त्यांनी एकताल, मत्तताल आणि त्रितालात राग यमनचा सुंदर विस्तार केला. बासरीवर असलेली त्यांची हुकुमत आणि लयकारीने त्यांनी सुंदर वातावरण निर्मिती केली. छोट्या बासरीवर पहाडी धून सादर करून त्यांनी श्रोत्यांच्या प्रचंड टाळ्या मिळवल्या. त्यांना अनिरुध्द देशपांडे यांनी तबल्यावर पूरक साथ करीत बासरीवादन अधिक खुलवले.
लातूरच्या वृषाली देशमुख यांनी राग रागेश्री सादर केला. ‘येरी पिया नही आये’ तर द्रुत तीनतालात त्यांनी 'बन बन बोलत कोयलिया' ही चीज सादर करून आपल्या मधुर गायनाचा परिचय करून दिला. 'ताण दे रे ना दिम तुम' हा तराणा सादर करीत रसिकांना डोलायला लावले. संत मीराबाईच्या 'मत वारो बालनिया को, हरी का संदेश मुझे' या रचनेने त्यांनी वातावरण भक्तीमय केले. धनराशी जाता मुढापाशी, सुखवी तुला सुखवी मला' हे नाट्यगीत गाऊन त्यांनी या जुन्या नाट्यपदाला सुंदर उजाळा दिला. त्यांना हार्मोनियमवर शशिकांत देशमुख आणि तबल्यावर मुकुंद मिरगे यांनी साथ दिली.
पैठण येथील मिलिंद गोसावी यांनी राग मालकंस सादर केला.'सखी मन लागे ना' ही चीज एकतालात तर 'माई री मै कैसे पाऊ दरस' ही चीज त्रितालात सादर करताना त्यांनी लयकारी आणि स्वररचनेचे उत्तम दर्शन घडवले. औरंगाबादचे ज्येष्ठ गायक तथा नाथवंशज पं. गिरीश गोसावी यांनी आपल्या गायनाने एका संपन्न आणि व्यासंगी गायनाचा परिचय करून दिला. पहिल्या संगीतसभेची सांगता पुण्याच्या पं. संजय गरुड यांच्या गायनाने झाली, राग कलावती आणि रागेश्रीचे मिश्रण असणारा राग कलाश्री त्यांनी सादर केला.
'जो भजे हरी को सदा, वो ही परम पद पायेगा' हे भैरवी रागातील अवीट पद विस्ताराने आणि आर्ततेने सादर करीत त्यांनी तब्बल सहा तास अखंडपणे चालू असलेल्या या मैफिलीची सांगता केली. त्यांना तबल्यावर अनिरुद्ध देशपांडे, धनंजय जळगावकर व हार्मोनियमवर शांतीभूषण चारठाणकर यांनी साथ करीत हे गायन अधिक संपन्न केले. या संगीतसभेचे सूत्रसंचालन अनंत
उमरीकर यांनी केले.