जालन्याच्या खासदारासाठी औरंगाबादकरांचा कौल निर्णायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:55 AM2019-04-21T00:55:49+5:302019-04-21T00:56:33+5:30
जालना मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यामुळे औरंगाबादकर काय कल देतात हे महत्वाचे असणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या तीन मतदारसंघात एकूण ९ लाख २२ हजार ८९५ मतदार आहेत. तर जालना जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांत ९ लाख २१ हजार १०६ मतदार आहेत. त्यामुळे औरंगाबादकर काय कल देतात हे महत्वाचे असणार आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वादामुळे जालना मतदारसंघ राज्यात चर्चेत आला होता. पण खोतकरांचे बंड शमल्यानंतर दानवेंचा रस्ता मोकळा झाला. मात्र, भीषण पाणीटंचाई, वादग्रस्त वक्तव्य आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार यामुळे जालना मतदार संघामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
२३ तारखेला जालना मतदार संघातील मतदान होणार आहे. रावसाहेब दानवे पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विलास औताडे यांना तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. शरदचंद्र वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. दानवे यांनी २०१४ मध्ये औतडेंचा पराभव केला होता. मात्र, यावेळचे गणित थोडं वेगळं असू शकते. पाणी टंचाईमुळे ग्रामीण भागातील मतदारराजा नाराज आहे. दानवेंनी केलेले वादग्रस्त वक्तव्य, काही गावांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार यामुळे दानवेंच्या अडचणी वाढु शकतात. दरम्यान, त्यामुळे दानवेही जोमाने कामाला लागले असून, ते मतदार संघ पिजून काढत असल्याचे पाहायला मिळत आहे.
शहरातील मतांचाही बसू शकतो फटका
जालना मतदार संघात येणाऱ्या जालना, भोकरदन, परतूर नगरपलिका काँग्रेसच्या ताब्यात आहे. तर बदनापूर नगरपंचायत फक्त भाजपच्या ताब्यात आहे. तसेच जाफराबाद नगरपरिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. त्यामुळे शहरातील मतांचा फटका दानवेंना बसू शकतो.
सिल्लोड काँग्रेस, पैठण सेना तर फुलंब्री भाजपच्या ताब्यात
सिल्लोड विधानसभा मतदार संघात आमदार अब्दुल सत्तार आहे. तर फुलंब्री मतदार संघात भाजपचे आमदार विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे आहे. तसेच पैठणमध्ये सेनेचे आमदार आहे. त्यामुळे याचा दानवेंना फायदा होईल की तोटा हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.