नागरिकांच्या सहभागातून ३५ कोटी लिटर पाणीसाठा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:15 AM2019-07-06T00:15:37+5:302019-07-06T00:15:49+5:30
आनंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तसेच राजुरी स्टीलचे संचालक शिवरतन मुंदडा यांच्या प्रयत्नातून कुंडलिका नदीचे दोन किलोमीटरपर्यंत उन्हाळ्यामध्ये खोलीकरण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आनंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तसेच राजुरी स्टीलचे संचालक शिवरतन मुंदडा यांच्या प्रयत्नातून कुंडलिका नदीचे दोन किलोमीटरपर्यंत उन्हाळ्यामध्ये खोलीकरण करण्यात आले. यामुळे जवळपास ३५ कोटी लीटर पाणीसाठा साठल्याची माहिती शिवरतन मुंदडा यांनी दिली.
रामतीर्थ बंधाऱ्याच्या मागील बाजूस हे खोलीकरण करण्यात आले. या खोलीकरणामुळे जवळपास दोन कि़मी.पर्यंत पाणीसाठा झाला आहे. या नदीच्या कॅचमेंट परिसरात दोन दिवसापूर्वी दमदार पाऊस झाल्याने हे नदीपात्र तुडंूब भरले आहे. यामुळे आसपासच्या जवळपास १० ते १५ नवीन वसाहतींचा पाणीप्रश्न सुटणार आहे.
गुरूवारी या पाण्याचे जलपूजन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेष महाराज गोंदीकर यांची उपस्थिती होती.
खोतकर यांनी मुंदडा व त्यांच्या मित्र परिवाराने गेल्या पाच वर्षापासून नदी खोलीकरणाच्या माध्यमातून जो उपक्रम हाती घेतला आहे. तो निश्चितच प्रेरणादायी आहे. सर्वांनी मिळून पाण्याची बचत आणि पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहीम राबविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी शेष महाराज गोंदीकर यांनीही मार्गदर्शन केले.