सरासरी ६६.३३ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 01:17 AM2019-10-22T01:17:08+5:302019-10-22T01:17:40+5:30
जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात सोमवारी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात मतदान झाले
६६.३३ टक्के मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात सोमवारी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात मतदान झाले. पावसाचा व्यत्यय वगळता मतदान शांततेत पार पडले. सकाळी ११ वाजल्यानंतर पाऊस थांबल्याने मतदानात उत्साह दिसून आला.
जालना शहर आणि ग्रामीण भागात पाहिजे तसेच मतदान झाले नसले तरी जिल्ह्यात सायंकाळपर्यंत सरासरी ६६.३३ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. २०१४ च्या निवडणुकीत ६० टक्के मतदान जालना विधानसभेत झाले होते. भोकरदन विधानसभेत जाफराबाद आणि भोकरदन या दोन तालुक्यांचा समावेश होतो. यात दोन्ही तालुक्यातून मतदानासाठी उत्साही वातावरण दिसून आले. मतदानासाठी सर्वत्र रांगा लागल्याचे चित्र होते. परतूर मतदार संघातही अशीच स्थिती कायम होती. तांडे आणि वाड्यांवर होणाऱ्या मतदानावरच बरेच काही अवलंबून राहणार आहे. युती असल्याने खोतकरांना या युतीचा लाभ मिळेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
परतूर विधानसभेत मंठा आणि परतूर हे दोन तालुके येतात. त्यात मंठा तालुक्यातही उत्साही वातावरणात मतदान झाले. तळणी, जयपुर, उस्वद, वाटूरफाटा तसेच श्रीष्टी, आष्टी येथे मतदानाला महिला आणि युवकांनी रांगा लावून मतदान केले. जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात अनेकांची नावे मतदार यादीत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या. मध्यंतरी मतदान यादीचे नव्याने सर्वेक्षण करतांना निवडणूक विभागाने मतदारांना आहवान करून मतदार यादीतील नावांमध्ये दुरूस्तीची संधी दिली होती. परंतु ्याकडे दुर्लक्ष झाल्याने आजची ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले. जालना विधानसभा वगळता अन्य चारही मतदारसंघात सरासरी ६० टक्के मतदान झाले. मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जवळपास दोन लााख विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पालकांचे संकल्पपत्र भरून घेण्यात आले होते. तसेच मतदार जागृतीसाठी विविध गावांमध्ये पथनाट्य आणि लोकगीतातून जागृती केल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी दीपाली मोतीयाळे यांनी दिली.
नवमतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
मतदानाचा हक्क पहिल्यांदाच बजावणा-या युवक- युवतींमध्ये मोठा उत्साह दिसून आला. लोकशाही प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची घटना म्हणून मतदानाकडे पाहिले जाते. नव मतदारांनी मतदान केल्यानंतर सेल्फी पॉइंटवर जाऊन छायाचित्र काढले. तर केलेल्या मतदानाचा फोटो अनेकांनी सोशल मीडियावरही अपलोड केला होता.
पायाने केली सही
दिव्यांगांनी मतदान करावे, यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने ठिकठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. भोकरदन तालुक्यातील करजगाव येथील चोरंगी प्रभाकर लोखंडे या दोन्ही हात नसलेल्या दिव्यांग युवकाने पायाने स्वाक्षरी करून मतदानाचा हक्क बजावला. लोखंडेसह इतर अनेक दिव्यांगांनीही मतदान केले.
पाऊस, चिखलाचाही परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात पावसाळा संपल्यानंतर परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावून मोठा दिलासा दिला आहे. हा परतीचा पाऊस गेल्या आठवडाभरापासून कधी हलका तर कधी मध्यम स्वरूपाचा पडला. मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच रविवारी जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. सोमवारी सकाळीही पाऊस सुरू होता.
जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या ८७ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला आहे. परतीच्या पावसाने दिलासा दिल्याने रबी हंगामातील शाळू ज्वारीला याचा चांगला परिणाम दिसून येईल. तर या पावसाचा फटका कापूस आणि सोयाबीनच्या सोंगणीला बसला आहे. मतदानाच्या दिवशी सोमवारी सकाळपासूनच रिमझिम पाऊस असल्याने अनेक मतदान केंद्रांमध्ये गळती लागली होती. भोकरदन तालुक्यात जवळपास १२ केंद्रांवर ताडपत्रीचे अच्छादन टाकून पावसापासून मशीनचा बचाव करण्याचा प्रयत्न झाला. जालना विधानसभा मतदार संघातील काही गावांमध्ये देखील मतदान केंद्रावर गळती लागल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या.
अनेक मतदान केंद्रांवर पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे दिसून आले. काही ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या मोबाईलच्या बॅटरीचा उपयोग करून मतदार यादीतील नावे शोधून काढली. तर काही मतदान केंद्रांवर रविवारीच विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कर्मचा-यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
काही केंद्रांवर रात्री ९ वाजेपर्यंत चालली मतदान प्रक्रिया...
भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार, आव्हाना, वालसावंगी, आसई, बरंजळा साबळे या गावातील सहा मतदान केंद्रांवर रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. तर जालना तालुक्यातील खणेपुरी येथेही रात्री ९ वाजेपर्यंत मतदान सुरू असल्याचे सांगण्यात आले.
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथेही रात्री ८ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. मंठा तसेच परतूर तालुक्यातही काही मतदान केंद्रांवर मशिनमध्ये बिघाड होणे तसेच सायंकाळी सहा नंतर मतदान केंद्राबाहेर रांगेत असलेल्या मतदारांमुळे हा उशीर झाल्याचे सांगण्यात आले.