वयोवृद्ध शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:27 AM2020-12-24T04:27:28+5:302020-12-24T04:27:28+5:30
शेषराव वायाळ परतूर : वयाचे कारण पुढे करीत अनेक वयोवृद्ध शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. बिघडलेल्या अर्थकारणामुळे ...
शेषराव वायाळ
परतूर : वयाचे कारण पुढे करीत अनेक वयोवृद्ध शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. बिघडलेल्या अर्थकारणामुळे शेतातील कामे करण्यासाठी या शेतकऱ्यांना आता सावकाराच्या दारात उभे राहावे लागत आहे.
पीककर्ज देण्यासाठी बँका काहीही कारण पुढे करून हे कर्ज देणे कसे टाळता येईल, हेच पाहत आहेत. एकीकडे शासन वयोवृद्धांना विविध सवलती व सेवा उपलब्ध करून देत आहे. मात्र, राज्यातील प्रमुख राष्ट्रीयीकृत बँका जाचक नियम व अटी लादून वयोवृद्ध शेतकऱ्यांना पीककर्जासह विविध कर्जांपासून वंचित ठेवत आहेत. कोणत्याही शेतकऱ्याने पीककर्ज घेतल्यास त्या कर्जाचा बोजा हा साताबारा उताऱ्यावर टाकण्यात येतो. एकदा सातबारा उताऱ्यावर बोजा आला की, ते कर्ज फेडणे बंधनकारच असते; अन्यथा जमिनीसंबंधी पुढील व्यवहार होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याच्या वयाचा प्रश्न येतो कुठे? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. अगोदरच वयोवृद्ध शेतकऱ्यांचा आधार संपलेला आहे. निसर्गाचीही साथ मिळत नाही. दरवर्षी शेतकऱ्यांसमोर नवीनच संकट उभे राहत आहे. यात आता बँकांच्या जाचक अटींमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांना सावकाराच्या दारात उभे राहावे लागत आहे.
पीककर्जाचे अर्ज स्वीकारले
वयोवृद्ध शेतकऱ्यांनी पीककर्ज मागणीचे अर्ज रीतसर भरून बँकांना दिले आहेत. बँकांनी हे अर्ज स्वीकारलेही आहेत. मात्र, आता शेतकरी विचारपूस करीत असताना वयाचे कारण पुढे करीत कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
प्रकरणे मार्गी लावावीत
बँकांनी विविध कारणे पुढे करून वयोवृद्ध शेतकऱ्यांची गैरसोय करू नये. शेतकऱ्यांना तात्काळ पीककर्ज वाटप करण्यात यावे. वयोवृद्ध शेतकऱ्यांची गैरसोय होत असेल, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड यांनी दिला.
कर्ज कोण भरणार?
पीककर्ज घेणाऱ्या वयोवृद्ध शेतकऱ्याचे निधन झाले, तर कर्ज वसुलीसाठी अनेक अडचणी येतात. त्यामुळे पीककर्ज देताना संबंधित शेतकऱ्याचे वय पाहिले जाते. कर्ज घेतले आणि त्यानंतर त्यांचे निधन झाले, तर पीककर्ज भरणार कोण? असे एका शाखा व्यवस्थापकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.