हृदयरोग टाळण्यासाठी व्यायामात सातत्य हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:39 AM2018-09-29T00:39:39+5:302018-09-29T00:40:04+5:30
दरवर्षी २९ सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी हृदयरोगाबाबत जनजागृती केली जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हृदयरोग हा श्रीमंतांचा आजार आहे असे मानले जाते. भारतातल्या चाळिशी ओलांडलेल्या अनेकांना हृदय रोगाचा उपद्रव कधीही होऊ शकतो. म्हणून भारतीयांनी हृदय विकाराच्या बाबतीत सावध राहिले पाहिजे. दरवर्षी २९ सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी हृदयरोगाबाबत जनजागृती केली जाते.
प्रत्येकाला रुग्णालयात जाऊन हृदय विकाराची चाचणी करून घेणे शक्य होईलच असे नाही. त्यामुळे काही सामान्य लक्षणांच्या आधारावर आपण अशी चाचणी करून घेऊ शकतो. आपल्याला छातीत असाह्य वेदना होत असतील आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर ताबडतोब जाऊन चाचणी करणे गरजेचे आहे. याबाबत सर्वसामान्यांच्या मनात असलेले काही प्रश्न आम्ही डॉ.रामेश्वर सानप यांच्यासमोर मांडले आहेत. त्यातील काही निवडक प्रश्न आणि त्यांची उत्तरे.
हृदयरोगाची लक्षणे कोणती?
सर्वात महत्त्वाचे म्हणजे छातीच्या मध्यभागी दाबल्यासारखे वाटणे किंवा जळजळ होणे हे दुखणे पुढच्या दहा ते तीस मिनीटांत वाढत जाते. चमक येणे, काही सेकदांपर्यंत दुखणे, श्वास घेतल्यावर दुखण्याची तीव्रता वाढत जाणे, ही लक्षणे हृदयरोगाची नाहीत. तरी सुध्दा छातीत कोणत्याही वेदना झाल्यास खबरदारी म्हणून ईसीजी करून घेणे क्रमप्राप्त ठरते.
ईसीजीमध्ये हृदयरोगाचे निदान होते काय आणि त्यापूढील तपासण्या कोणत्या?
ईसजीमध्ये हार्ट अॅटॅकचे निदान होते. पण, नॉर्मल ईसीजी म्हणजे तुम्हाला हृदयाचा आजार नाही असे नाही. अशा रूग्णांना 2-डी - इको अॅन्ड स्ट्रेस टेस्ट या पुढील तपासण्या करून घ्याव्यात.
अॅन्जोप्लॅस्टी झालेल्या पेशंटच्या गोळ्या बंद होऊ शकतात का?
नाही, अॅन्जोप्लॅस्टी झालेल्या रूग्णांना जीवनभर रक्त पातळ होण्याच्या गोळ्या खाव्या लागतात. जर गोळ्या बंद केल्यास त्यांच्या स्टेन्ट बंद होवून रूग्ण दगावण्याची शक्यता असते.
ब्लडप्रेशर आणि शुगरच्या गोळ्याने किडनीवर काही परिणाम होतो का?
नाही, ब्लडप्रेशर आणि शुगर या रोगांवर गोळ्या उच्च दर्जाच्या तयार आहेत, त्याचा कुठलाही विपरीत परिणाम किडनीवर होत नाही. दरम्यान या गोळ्या नियमित घेतल्याने मधुमेह तसेच ब्लडप्रेशरचा किडनी व मेंदूवर होणारा परिणाम टाळू शकतो.
दररोज किती व्यायाम केला पाहिजे?
हृदयरोग टाळण्यासाठी प्रत्येकाने किमान ३० मिनिटे वेगाने पायी चालल्यास त्याचा त्यांना चांगला परिणाम दिसून येईल. योग साधना, तसेच धावणे हे देखील शरीराच्या सुदृढतेसाठी गरजेचे आहे. जे धावण्यास व पोहण्यास सक्षम आहेत त्यांनी त्यांच्या परीने झेपतील असे व्यायाम केल्यास त्याचाही लाभ होऊ शकतो.
हृदयरोग रूग्णाची थेट अॅन्जोप्लॅस्टी करता येते का?
होय, हार्ट अॅटॅकच्या रूग्णाचे रक्त पातळ होण्याचे इंजेक्शन न देता त्याची अॅन्जोप्लॅस्टी करता येऊ शकते. प्रायमरी अॅन्जोप्लॅस्टीमुळे खर्च वाचतो. तसेच हृदयाची हानी कमी होण्यास मदत होते. असे डॉ.सानप म्हणाले.