कुपोषणाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:13 AM2017-11-22T00:13:43+5:302017-11-22T00:13:55+5:30
एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यात केलेल्या तपासणीत ० ते ५ वयोगटातील १२८९ बालके कुपोषित आढळून आली आहेत.
बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कुपोषणमुक्तीसाठी राज्य शासनामार्फत विशेष प्रयत्न केले जात आहे. असे असले तरी ग्रामीण भागात कुपोषणाची समस्या अद्याप कायम आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यात केलेल्या तपासणीत ० ते ५ वयोगटातील १२८९ बालके कुपोषित आढळून आली आहेत. यामध्ये तीव्र कुपोषित बालकांची संख्या २९९ इतकी आहे.
कुपोषित बालकांच्या श्रेणी संवर्धनाची जबाबदारी महिला व बालविकास विभाग व आरोग्य विभागाकडे आहे. जिल्ह्यातील कुपोषित मुलांचा शोध घेण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, आशा कार्यकर्त्यांमार्फत जिल्ह्यातील एक हजार ९५४ अंगणवाड्यांमध्ये ० ते पाच वयोगटातील एक लाख ३९ हजार २७७ बालकांची तपासणी करण्यात आली. बालकांचे वजन व उंची वयानुसार योग्य आहे का, त्यांच्या कमरेचा व दंडाचा घेर याचे मोजमाप करून कुपोषित व तीव्र कुपोषित, असे वर्गीकरण करण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय अधिका-यांमार्फत करण्यात आलेल्या तपासणीमध्ये ९९० बालके मध्यम तर २९९ बालके गंभीर तीव्र कुपोषित आढळून आली आहेत. अंबड, भोकरदन, जाफराबाद या तालुक्यांत कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक आहे. आता या कुपोषित बालकांना सर्वसामान्य बालकांच्या श्रेणीत आणण्यासाठी अंगणवाडी स्तरावर ग्राम बाल विकास केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. या केंद्राच्या माध्यमातून कुपोषित बालकांना १२ आठवडे विशेष पूरक आहाराचे वाटप केले जाणार आहे. आहार वाटप सुरू असताना प्रत्येक आठवड्याला बालकांचे वजन तपासले जाणार आहे. कमी वजनाची मुले सर्वसामान्य मुलांच्या श्रेणीत येत नाहीत, तोपर्यंत ग्राम केंद्र सुरू राहणार आहे. ज्या बालकांच्या वजनात वाढ होत नाही, अशांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. यात मुलांना नेमका कोणता आजार आहे याचे निदान करण्यात येणार आहे.