उपचाराअभावी बाळ दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 01:37 AM2018-06-28T01:37:14+5:302018-06-28T01:37:42+5:30
ग्रामीण रूग्णालयात नाजमाबी मुजाहेद पठाण या महिलेला प्रसुतीच्या वेदना तीव्र होत असल्याने उपचारासाठी २५ जून रोजी दाखल करण्यात आले होते. मात्र, वेळेत रूग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातच बाळ दगावल्याची तक्रार महिलेचे पती मुजाहेद समशेरखान पठाण यांनी जि. प. च्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : येथील ग्रामीण रूग्णालयात नाजमाबी मुजाहेद पठाण या महिलेला प्रसुतीच्या वेदना तीव्र होत असल्याने उपचारासाठी २५ जून रोजी दाखल करण्यात आले होते. मात्र, वेळेत रूग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातच बाळ दगावल्याची तक्रार महिलेचे पती मुजाहेद समशेरखान पठाण यांनी जि. प. च्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.
नाजमाबी मुजाहेद पठाण ही महिला प्रसुतीसाठी रूग्णालयात आली असता, त्यांच्यावर येथे उपचार होणार नसल्याचे सांगून तुम्ही त्या महिलेला जालना अथवा अन्यत्र हलवा अशी सूचना उपस्थित वैद्यकीय कर्मचा-यांनी केली. त्यावेळी रूग्णांच्या नातेवाईकांनी रूग्णवाहीका देण्याची मागणी केली. मात्र रूग्णवाहीका नादुरूस्त असल्याचे कारण सांगून टाळाटाळ केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गतची रूग्णवाहिका रूग्णालयात उभी होती, मात्र ती नादुरूस्त असल्याची माहिती डॉ. रमेश हरणे यांनी दिली. रूग्णवाहिका उपलब्ध होण्यातच रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा एक ते दीड तास खर्ची झाला. नंतर रूग्णाला खाजगी वाहनाने जालन्याकडे नेले जात असतानाच जाफराबाद ग्रामीण रूग्णालयात उभी असलेली रूग्णवाहीका दुस-या रूग्णाला घेऊन जालन्याला गेल्याचा आरोप नाजमाबी मुजाहेद यांच्या पतीने तक्रारीत केला आहे.
रूग्णालयातील हलगर्जीपणा करणा-या अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाईची मागणीही तक्रारीत केली आहे.