बदनापूर; आंदोलनास हिंसक वळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:51 AM2018-07-27T00:51:20+5:302018-07-27T00:51:52+5:30
बदनापूर : येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी केलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागले त्यामध्ये झालेल्या दगडफेकीत एक ट्रॅव्हल बस, दोन ट्रक व एका पोलीस वाहनावर दगडफेक करण्यात आली
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारी केलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागले त्यामध्ये झालेल्या दगडफेकीत एक ट्रॅव्हल बस, दोन ट्रक व एका पोलीस वाहनावर दगडफेक करण्यात आली यामुळे तीन तास जालना - औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक बंद होती
बदनापूर येथील महाराष्ट्र बँकेसमोर जालना-औरंगाबाद महामार्गावर सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित आंदोलकांना अनेकांनी मार्गदर्शन करून शासनाचा निषेध व्यक्त केला, आणि मराठा आरक्षण त्वरित देण्याची मागणी केली. हे ठिय्या आंदोलन शांततेत सुरू असतानाच या महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांवर अचानक दगडफेक करण्यात आल्याने आंदोलन पेटले. त्यानंतर आंदोलक सर्वत्र पळू लागले. यावेळी आंदोलनस्थळापासुन काही फुटाच्या अंतरावर उभ्या असलेल्या दोन ट्रकवर प्रथम दगडफेक करण्यात आली त्यानंतर या ट्रकच्या मागे उभी असलेली सूरत येथील आर. आर. ट्रॅव्हल्सच्या बसला लक्ष्य करून तिच्यावर दगडफेक करण्यात आली ही बस सूरतहून जालना येथे चालली होती. यावेळी या बसमध्ये आठ ते दहा प्रवासी होते. यापैकी काही प्रवाशांना या दगडफेकीत किरकोळ मार लागल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांचा संयम
शहरात दगडफेकीचा प्रकार होताच सर्वत्र तणावपूर्ण वातावरण झाले होते. मात्र, अशा परिस्थितीतही पोलिसांनी आपला संयम कायम ठेवला त्यामुळे परिस्थितीवर लवकर नियंत्रण मिळाले. पोलिसांनी या प्रकारानंतर महामार्गावर कुणीही थांबणार नाही याची दक्षता घेतली. महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला होता तसेच एका जीपद्वारे नागरिकांना घराच्या बाहेर पडू नये, शांतता बाळगावी असे आवाहन करण्यात येत होते.