पावसाने उघडीप दिल्याने बळीराजा चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:20 AM2021-06-23T04:20:28+5:302021-06-23T04:20:28+5:30
घनसावंगी : घनसावंगी तालुक्यात मृग नक्षत्रात झालेल्या जोरदार पावसाने मागील आठ दिवसांपासून उघडीप दिली आहे. त्यामुळे पिके सुकू लागली ...
घनसावंगी : घनसावंगी तालुक्यात मृग नक्षत्रात झालेल्या जोरदार पावसाने मागील आठ दिवसांपासून उघडीप दिली आहे. त्यामुळे पिके सुकू लागली आहेत. परिणामी, शेतकरी चिंतित असून, मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
घनसावंगी तालुक्यात १ ते १८ जूनपर्यंत १३५.५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. चालू वर्षात आतापर्यंत पडलेल्या पावसाची टक्केवारी २१.२२ एवढी आहे, तर गतवर्षी याच कालावधीत १२७.५८ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा घनसावंगी तालुक्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत ६३८.४० मिलिमीटर पावसाचा अंदाज आहे. नेहमीच दुष्काळाच्या झळा सहन केलेल्या तालुक्यात यंदा जूनच्या सुरुवातीलाच पावसाचे जोरदार आगमन झाले. बहुतांश शेतकऱ्यांनी उसनवारी करून पेरणी केली. सध्या पिके उगवून आली आहेत. परंतु, मागील आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पिके सुकून चालली असून, शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
यंदा घनसावंगी तालुक्यात ८२,४६३ हेक्टरवर खरिपाची पेरणी होण्याचा अंदाज आहे. यात कापसाची सर्वाधिक ४८,०१२ हेक्टरवर लागवड केली जाणार आहे. त्यापैकी आतापर्यंत २३,८६६ हेक्टरवर लागवड झाली आहे. त्यापाठोपाठ तूर १८८९, सोयाबीन २४६९, मूग १२५६, तर बाजरीची ५०९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. अचानक पावसाने उघडीप दिल्याने कापूस, तूर, सोयाबीन, बाजरी, उडिदाच्या पेरणीवर त्याचा परिणाम झाला आहे.