गोळ्या झाडण्याचे आदेश देणाऱ्या नेत्यांना मराठवाडा बंदी करा, राज ठाकरेंचे आवाहन
By विजय मुंडे | Published: September 4, 2023 11:49 AM2023-09-04T11:49:57+5:302023-09-04T11:51:10+5:30
''गेंड्याची कातडी पांघरलेल्या राजकारण्यांसाठी जीव गमवू नका''
जालना : तुम्ही पोलिसांना दोष देवू नका. त्यांना आदेश कोणी दिले त्यांना दोष द्या. ज्यांनी लाठीमार केला त्यांना मराठवाडा बंदी करा. माफी मागत नाहीत तोपर्यंत इकडे फिरकू देवू नका. मराठा आरक्षणासाठी आपण मुख्यमंत्र्यांसह तज्ज्ञांशी बोलू. प्रश्न सुटण्यासारखा असेल तर नक्की त्यासाठी प्रयत्न करू. गेंड्याची कातडी असलेल्या या लोकांसाठी जीव गमवू नका, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्याशी सोमवारी सकाळी राज ठाकरे यांनी संवाद साधून माहिती घेतली. त्यानंतर उपोषणस्थळी उपस्थित नागरिकांसामोर ठाकरे बोलत होते. ज्या ज्या वेळी मी काही गोष्टी सांगितल्या त्या त्या वेळी त्या तुमच्यापर्यंत चुकीच्या पोहोचविण्यात आल्या. मोर्चे निघत होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही असे सांगितलं होते. ते सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतील, मते घेतील दुर्लक्ष करतील असे सांगितले. सुप्रिम कोर्टाने आरक्षणाबाबत निकाल दिला आहे. विरोधात असले की मोर्चे काढायचे आणि सत्तेत गेले की गोळीबार करायचा, लाठ्या मारायच्या. तुम्ही पोलिसांना दोष देवू नका. पोलिसांना कोणी आदेश कोणी दिले त्यांना दोष द्या. पोलिस काय करणार ते तुमच्या आमच्यातले आहेत. जे वरून सांगितले ती गोष्ट करावी लागणार. त्यामुळे तुमच्यावर ज्या लोकांनी लाठ्या बरसावल्या, गोळीबार केला. त्यांना मराठवाडा बंदी करा. जोपर्यंत ते माफी मागत नाहीत तोपर्यंत इकडे पाऊल टाकू देवू नका. असे आवाहनही ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी मी मुख्यमंत्री आणि तज्ज्ञांशी बोलतो. प्रश्न सुटण्यासारखा असेल तर नक्की सोडविला जाईल. तुम्ही गेंड्यांच्या कातडीच्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका. एकजण मेला तर त्यांना फरक पडत नाही. पण जीव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. निवडणूक येतील तेव्हा अशा काही गोष्टी समोर आणतील. तेव्हा काठीचे पाठीवरील वळ लक्षात ठेवा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले. यावेळी अमित ठाकरे यांची उपस्थिती होती.
फडणवीस यांच्यावर हल्लाबोल
माता-भगिनींवर झालेला लाठीमार पाहून मी येथे आलो आहे. मला राजकारण करायचे नाही. परंतु, देवेंद्र फडणवीस राजकारण करू नये म्हणतात. तुम्ही विरोधी पक्षात असते तर काय केले असते असा सवाल करीत देवेंद्र फडणवीस यांच्यावरही ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
गडकिल्ले महाराजांचे स्मारक
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रात उभा करायचा म्हणत त्यांनी मते मागितली. समुद्रात जावून फुलं टाकली. तेव्हापासून सांगतोय हा पुतळा होवू शकत नाही. समुद्रात पुतळा उभा करणे अशक्य गोष्ट आहे. महाराजांचे स्मारक हे आपले गडकिल्ले आहेत. त्यांना टिकवा. आपला राजा कसा होवून गेला ते पुढच्या पिढ्याला दाखिवले पाहिजे.