बाणेगाव प्रकल्प कोरडाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:11 AM2019-08-20T00:11:54+5:302019-08-20T00:12:46+5:30
दुष्काळी परिस्थितीत तालुक्याची तहान भागविणारा बाणेगाव प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे. तसेच पावसाअभावी गावा- गावात पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे.
भोकरदन : दुष्काळी परिस्थितीत तालुक्याची तहान भागविणारा बाणेगाव प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे. तसेच पावसाअभावी गावा- गावात पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे.
भोकरदन तालुक्यात यंदा १९७२ पेक्षा महाभयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. पिण्यासाठी पाणी कोठून आणावे असा प्रश्न प्रशासनाला पडला होता. तालुक्यातील सर्वच धरणे ८ ते ९ महिन्यांपूर्वीच कोरडे पडले होते. मात्र, भोकरदन- जालना रस्त्यावरील बाणेगाव मध्यम प्रकल्पात असलेल्या पाणी साठ्यामुळे भोकरदन शहरासह ५० गावांची तहान भागविण्याचे काम या धरणातुन टँकरद्वारे करण्यात आले होते.
जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे धरण सुध्दा कोरडे पडले होते. मात्र, त्यानंतर जुनच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यातील उत्तर
भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे दानापूर येथील जुई, शेलुद येथील धामणा व पदमावती येथील पद्मावती मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटला होता. मात्र, ज्या धरणातुन दुष्काळी परिस्थीतीत पूर्ण तालुक्याची तहान भागविण्याचे काम करण्यात आले. त्या बाणेगाव धरणात या पावसाळ््यात साधा एक थेंब सुध्दा पाणी आले नाही. त्यामुळे धरणाच्या कार्यक्षेत्रातील जमिनीवर शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका, या पीकाची लागवड केली आहे. तर भिंतीच्या जवळपास सर्वत्र हिरवळीने तलावर बहरल्याचे दिसत आहे़
पुर्णा, गिरजा, केळना नद्या पाण्याविना
तालुक्यातील प्रमुख मोठ्या नद्या असलेल्या पुर्णा, गिरजा, व केळना या नद्यांना या पावसाळ््यात केवळ एक- दोन पूर गेले आहेत. मात्र, दरवर्षी आॅगस्ट महिन्यात काळ्या पाण्याने या नद्याचे पात्र वाहत असते, यावर्षी या तिन्ही नद्याच्या पात्र ओसाड पडल्याचे दिसत आहे.
एकाही नदीमध्ये पाणी वाहताना दिसत नाही. जर मोठा पाऊस झाला नाही तर अर्ध्या तालुक्यात गेल्या वर्षीसारखी भिषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. तर जुई, धामणा व दक्षिण भागातील नदी नाल्यांना मात्र काळे पाणी वाहताना दिसत आहे़