पोलिसांच्या निर्देशांकडे बँकांची सर्रास डोळेझाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:41 AM2019-07-17T00:41:08+5:302019-07-17T00:41:52+5:30
जालाना जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, नागरी सहकारी बँका आणि अन्य वित्तीय संस्था मिळून जवळपास १०४ पेक्षा अधिक आहेत.
जालना : जालाना जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, नागरी सहकारी बँका आणि अन्य वित्तीय संस्था मिळून जवळपास १०४ पेक्षा अधिक आहेत. त्यात सर्व मिळून अंदाजित तीन हजार कोटी रूपयांच्या ठेवी असून, रोजची उलाढाल ही काहीशे कोटी रूपयांमध्ये होते.
एवढे सर्व व्यवहार होत असतांना अनेकजण आपल्या कष्टाचा पैसा हा सुरक्षीत राहावा म्हणून बँक, पतसंस्थांमध्ये ठेवताता. मात्र, या संस्थाच जर पैशांच्या सुरक्षेकडे एवढे दुर्लक्ष करत असतील तर मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. याचे ताजे उदाहरण म्हणजे जालन्यातील एसबीआय शाखेची तिजोरी फोडण्याचा झालेला प्रयत्न पुरेसा बोलका आहे.
जालना शहर हे व्यापार आणि उद्योगांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथे दररोजच कोट्यवधी रूपयांचे व्यवहार हे नित्याचेच आहेत. त्यातच हजारो कोटी रूपयांच्या ठेवी जालन्यातील जवळपास ३५ राष्ट्रीयकृत आणि ५७ सहकारी बँका, पगारदारांच्या पतसंस्थांमध्ये ठेवलेल्या आहेत. एकूणच हे पैसे ग्राहकांना बँकांमध्ये रांगांमध्ये उभे राहून काढण्यासाठी जाणारा वेळ कमी व्हावा म्हणून एटीएम सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु हे एटीएमच लांबवून त्यातील रक्कम लांबविण्याचे प्रकार जालन्यातही घडले होते. परंतु एवढे सर्व होऊनही बँकांचे व्यवस्थापन हे सुरक्षेकडे कानाडोळा करत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जालना शहरातील गांधीचमन भागातील एसबीआय बँकेच्या शटरच्या कुलूपा तोडून एका चोरट्याने थेट बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्याला यश आले नाही. त्या तिजोरीत ५४ लाख रूपये होते, अशी माहिती बँक व्यवस्थापकाने पोलिसांना दिली. जर तिजोरी फोडण्यात चोरट्याला यश आले असते तर, मोठा अनर्थ ठरला असता असे बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूणच या प्रकारामुळे पोलिसही धास्तावले आहेत.