शेलगावकरांचा ठिय्या..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 12:19 AM2019-10-11T00:19:26+5:302019-10-11T00:19:58+5:30
बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील संजय अंभोरे खून प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करावा, इतर आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरूवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर व जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील संजय अंभोरे खून प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करावा, इतर आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरूवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर व जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला होता.
बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील संजय किसनराव अंभोरे हे ७ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास गावातील रोडलगत असलेल्या पानटपरीवर बसले होते.
त्यावेळी तेथे आलेल्या दोघांनी एमआयडीसी येथे कामगार पुरविण्याच्या ठेक्यावरून झालेल्या भांडणाच्या कारणावरून गोळीबार करून त्यांचा खून केला. संबंधितांना पकडण्यासाठी गावातील दोघे धावले. त्या दोघांनी गोळीबार केला. मात्र, सुदैवाने ते दोघे बचावले आहेत. या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, संजय अंभोरे यांच्या सर्वच मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी, या गुन्ह्याचा तपास सीआयडीमार्फत करावा किंवा आतंकवादी विरोधी पथकामार्फत तपास करावा इ. मागण्या यावेळी ग्रामस्थांनी केल्या.
पोलीस अधीक्षक कार्यालयात अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारून कारवाईचे आश्वासन दिले. तसेच एडीएसचे प्रमुख पोनि यशवंत जाधव यांनीही ग्रामस्थांशी संवाद साधून उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर उपस्थितांनी जिल्हाधिकारी कार्यालयातही ठिय्या मांडून मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी राजू अंभोरे, सुधाकर अंभोरे, सुखदेव अंभोरे, अंकुश अंभोरे, सहदेव अंभोरे, अर्जुन उढाण, गजान अंभोरे, मुक्तीराम बिडवे, भगवान खरात, कृष्णा वाघमारे, संजय अंभोरे, शेख हफिज, शिवाजी अंभोरे, राम जाधव, संदीप वैद्य, गणेश वाघमारे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
निवेदनात इशारा: तर विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकू
शेलगाव ग्रामस्थांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा दंडाधिकारी यांनाही दिले आहे. २० आॅक्टोबरपर्यंत सर्वच आरोपींना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आरोपींना अटक झाली नाही तर विधानसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.