जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:27 AM2021-03-07T04:27:49+5:302021-03-07T04:27:49+5:30
परतूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. असे ...
परतूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही परतूर येथील जि. प. प्रशाळेच्या मैदानात शनिवारी आठवडी बाजार भरविण्यात आला होता. परंतु, ग्राहक नसल्याने शेतकऱ्यांना कवडीमोल भावात भाजीपाला विकण्याची वेळ आली.
परतूर शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. असे असतानाही परतूर येथील जि. प. प्रशाळेच्या मैदानावर आठवडी बाजार भरविण्यात आला होता, तर काही विक्रेत्यांनी आपली दुकाने मुख्य रस्त्यावर थाटली होती. परंतु, येथील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे दिसून आले. याकडे नगरपालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, आठवडी बाजारात ग्राहक नसल्याने कवडीमोल भावात भाजीपाला विकावा लागला. कोणत्याच भाजीपाल्यास भाव मिळत नसल्याने लागवड, काढणी व वाहतुकीचा खर्चही निघणे अवघड झाले आहे.
टोमॅटोची पाच रुपये किलोने विक्री
मागील काही दिवसांपासून भाजीपाल्याचे भाव चांगलेच गडगडले आहेत. टोमॅटो उत्पादक तर भाव नसल्याने हैराण झाले आहेत. टोमॅटोची केवळ पाच रुपये किलोने विक्री होत आहे. यामुळे भाजीपाला उत्पादक मोठ्या संकटात सापडले आहेत.