सराफा व्यापाऱ्यास लुटणारे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 01:25 AM2019-07-02T01:25:21+5:302019-07-02T01:25:28+5:30
सराफा पिता-पुत्रास लुटणा-या टोळीतील तिघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने औरंगाबाद येथून जेरबंद केले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सराफा पिता-पुत्रास लुटणा-या टोळीतील तिघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने औरंगाबाद येथून जेरबंद केले. ही कारवाई रविवारी करण्यात आली असून, संबंधितांकडून दोन कार, दागिन्यांसह गुन्ह्यात वापरलेली हत्यारे असा जवळपास ८ लाख ८० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रशांत अंकुश हिवाळे, विजय रामकिशन जईद (दोघे रा. राजनगर मुकुंदवाडी औरंगाबाद, गणेश सांडू बदर (रा. डोगरगाव ता. सिल्लोड जि.औरंगाबाद ह.मु. जयभवानी नगर, औरंगाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. भोकरदन तालुक्यातील राजूर येथील सराफा व्यापारी विनयकुमार बाफना व त्यांचा मुलगा नवनीत हे दोघे २४ मे रोजी सायंकाळी कारमधून जालना शहराकडे येत होते. घानेवाडी पाटीजवळ कार आडवी लावून लोखंडी रॉडनेकाचा फोडून, तलवार व गावठी पिस्टलचा धाक दाखवित सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असलेली बॅग लुटून नेली होती. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांची पथके आरोपींचा शोध घेत होती. घानेवाडी पाटीजवळ सराफा व्यापा-याला लूटणा-या टोळीतील एक आरोपी राजनगर, मुकुंदवाडी औरंगाबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि राजेंद्रसिंह गौर यांनी पथकासह रविवारी सायंकाळी मुकुंदवाडी येथील राजनगर भागात कारवाई करून प्रशांत हिवाळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर विजय जईद, गणेश बदर या दोघांना जेरबंद करण्यात आले. तिघांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देत मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर, पोउपनि ज्ञानेश्वर सानप, दुर्गेश राजपुत, पोना सॅम्युअल कांबळे, फुलचंद हजारे, गोकुळसिंग कायटे, रंजित वैराळ, संजय मगरे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, हिरामण फलटणकर, सागर बावीस्कर, पोकॉ सचिन चौधरी, राहूल काकरवाल, वैभव खोकले, विलास चेके, धम्मपाल सुरडकर, महिला कर्मचारी शमशाद पठाण यांच्या पथकाने केली.
दोन कारसह हत्यारे जप्त : तिघांना पोलीस कोठडी
स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत सात लाख रुपये किमतीच्या दोन कार, गुन्ह्यात वापरलेले लोखंडी रॉड, तलवार जप्त करण्यात आली आहे. तसेच १ लाख ५८ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, चांदीचे ६ शिक्के व रोख २२ हजार रुपये असा एकूण ८ लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लुटमार प्रकरणात अटक असलेलेल्या तिघांना पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर केले होते. त्या तिघांना न्यायालयाने ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटकेतील तिघांची चौकशी सुरू असून, त्यांच्याकडून इतर अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.