"मराठा समाजास मदत न करता आमदार बनू, या आविर्भावात राहू नका"; मनोज जरांगेंचा इशारा
By शिवाजी कदम | Updated: July 13, 2024 16:36 IST2024-07-13T16:35:15+5:302024-07-13T16:36:05+5:30
''मी सरकारला सावध करतोय, आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास...''; मनोज जरांगेंचा इशारा

"मराठा समाजास मदत न करता आमदार बनू, या आविर्भावात राहू नका"; मनोज जरांगेंचा इशारा
जालना: मराठा समाजास मदत न करता आपण आमदार राहू, अशा आविर्भावात कोणीही राहू नये, राज्यातले २८८ आमदार पाडण्याची ताकद मराठा समाजात आहे. शनिवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथे शांतता रॅलीस निघण्यापूर्वी त्यानी जालना येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
विरोधकांनी सरकारने बोलावलेल्या बैठकीला जायलाच हवे होते. पण ते गेले नाही. म्हणून तुम्ही ते कारण आम्हाला सांगणार का? तुम्ही सरकार आहात. विरोधक नाही आले तरी तुम्ही सांगितले पाहिजे, त्यांचे कारण सांगून तुम्हाला द्यायचे आहे नाही का? तुम्ही का रोष अंगावर घेत आहात. सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही. मी सरकारला सावध करतोय, आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास २८८ उमेदवार पाडण्याची ताकद मराठा समाजात असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
सध्याच्या राज्य सरकारला मराठ्यांच्या आमदारांनीच सत्तेवर बसवले आहे. विधान परिषद निवडणुकीत जे आमदार निवडून आले आहेत. त्यांना मराठ्यांनी आमदार केले आहे. यामुळेच समाजावर अन्याय झाला तर, ज्यांना निवडून दिले ते पुन्हा निवडून येणार नाहीत. ज्यांनी या आमदारांना मतदान केलं त्यांची जबाबदारी आहे आता जातीयवाद होऊ नये. अशी अपेक्षा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.
सध्या लबाड सरकार सत्तेवर बसले आहे. कुणबी नोंदी शोधण्याचे काम थंडावले आहे. ज्यांना प्रमाणपत्र मिळाले आहे त्यांना व्हॅलिडिटी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अडचणी येत आहे. यामुळेच अभ्यासक्रमास निश्चित झाले तरी व्हॅलिडिटी प्रमाणपत्र मिळत नसल्याने दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे.असे मनोज जरांगे यांनी सांगितले.