वारंवार अपमान करत असल्याने व्यसनी पित्यानेच केली मुलाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 02:23 PM2019-05-16T14:23:42+5:302019-05-16T14:24:30+5:30
मृताचे वडील व्यसनी आणि कर्जबाजारी असल्याने त्यांच्यात सतत वाद होत असत
जालना : रामखेडा हत्या प्रकरणात मुलगा वारंवार चारचौघात अपमान करतो याचा राग मनात धरून पित्यानेच मुलाची धारदार शस्त्राने हत्या केल्याचे आज उघडकीस झाले. संतोष हनुमान कुरधने (२२) असे मृत मुलाचे नाव असून बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी हनुमान कुरधने यांना पहाटेच ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्वत:च्या घरात एकटा झोपलेल्या संतोषचा धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना बदनापूर तालुक्यातील रामखेडा येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली होती. मूळचे नंदापूर (ता. जालना) येथील रहिवासी असलेले कुरधने कुटुंब १० वर्षांपासून रामखेडा येथे मजुरीसाठी स्थायिक झाले आहे. आई-वडील शेजारील कुटुंब बाहेरगावी गेल्यामुळे त्यांच्याकडे झोपण्यासाठी गेले होते. स्वत:च्या घरात एकटाच झोपलेल्या संतोषचा डोक्यात वार करून खून करण्यात आल्यानंतर गावात खळबळ उडाली होती.
पोलिसांनी याबाबत तपास केला असता संतोषचे वडील हनुमान कुरधने याच्या जबाबात तफावत आढळून आली. तसेच संतोषवर काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची घटना घडली होती. या दृष्टीनेही पोलिसांनी तपास केला. गावात माहिती घेतली असता हनुमान ने व्यसनी असल्याने कर्जबाजारी होते यातून बाप-लेकात सतत वाद होत अशी माहिती मिळाली. जबाबात तफावत आणि इतर माहितीवरून पोलिसांनी आज पहाटे हनुमान यास ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा काबुल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यांनी केला तपास
पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एडीसचे यशवंत जाधव, बदनापूरचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर आणि पोलीस कॉ. अनिल काळे आदी कर्मचाऱ्यांनी तपास केला.