टायगर श्रॉफची नायिका बनवतो; साडेचार लाख दे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 01:13 AM2018-05-20T01:13:22+5:302018-05-20T01:13:22+5:30
टायगर श्रॉफसोबत चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी गार्डियन व अन्य खर्चासाठी पैसे लागतील, असे सांगून एका कथित दिग्दर्शकाने जालन्यातील एका तरुणीला साडेचार लाखांंना गंडा घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तुम्हाला प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफसोबत चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी गार्डियन व अन्य खर्चासाठी पैसे लागतील, असे सांगून एका कथित दिग्दर्शकाने जालन्यातील एका तरुणीला साडेचार लाखांंना गंडा घातला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
चित्रपटात काम करण्याची तरुण-तरुणींमध्ये प्रचंड क्रेझ असते. त्यासाठी अनेक खटाटोपही केले जातात. याचा फायदा घेत अनेकजण चित्रपटात तरुणांची फसवणूकही करतात. असाच प्रकार जालन्यातील प्राजक्ता सुनील ढाकणे (२०, रा. कालीकुर्ती) या तरुणासोबत घडला. एका वर्तमान पत्रात बॉलीवूडमध्ये काम मिळवून देण्याबाबत आलेल्या जाहिरातीच्या आधारे प्राजक्ता यांनी दिल्लीच्या इम्पक्ट फिल्म अॅण्ड प्रा. लि. या कंपनीच्या क्रमांकावर संपर्क केला. त्यानंतर नाशिकहून हर्षद आनंद सपकाळ व दिल्लीहून सुनील बोरा यांनी प्राजक्ता यांच्याशी संपर्क साधला. दोघांनी काम मिळवून देता म्हणून वारंवार संपर्क करून विश्वास संपादन केला. त्यानंतर प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफच्या नायिकेची भूमिका मिळाल्याचे सांगितले. यासाठी गार्डियन फीस व अन्य खर्चासाठी सव्वा तीन लाख रुपये लागतील असे सांगितले. प्राजक्ता यांनी दोघांवर विश्वास ठेवून तीन लाख २४ हजार रुपये आॅनलाइन ट्रान्सफर केले. त्यानंतर दोघांनी वारंवार संपर्क करून वेगवेगळ्या फिसच्या नावाखाली वेगवेगळ्या तारखांना आणखी एक लाख २७ हजार रुपये उकळले.
पैसे उकळले : शूटिंगचा पत्ता नाही
प्रत्यक्ष कामाबाबत विचारल्यानंतर लवकरच शूटिंग सुरू होणार असल्याचे सांगितले. वारंवार संपर्क करूनही कुठलेच काम मिळत नसल्याने सदर दोघांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर प्राजक्ता ढाकणे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणातील आरोपींच्या शोधात पोलिसांचे पथक मुंबईला गेले आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी दिली.
चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने संशयितांनी या पूर्वी अशाच पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे.