संतोष देशमुखांच्या लेकीचा टाहो! पप्पा, मला माफ करा, आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 11:30 IST2025-01-11T11:30:09+5:302025-01-11T11:30:29+5:30
देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबीयांसाठी एकवटले सर्वधर्मीय; मोर्चानंतर जरांगे पाटील यांनी उपस्थितांना केलं संबोधित

संतोष देशमुखांच्या लेकीचा टाहो! पप्पा, मला माफ करा, आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही!
लोकमत न्यूज नेटवर्क , जालना: माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली त्यांना एकच प्रश्न विचारते, का तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून मारले. त्यांना त्यावेळी किती वेदना झाल्या असतील. त्याचे उत्तर मला हवे आहे. पप्पा, आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही, अशी खंत मृत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने व्यक्त करताच उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी तरळले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि दोन्ही कुटुंबांना न्याय मिळावा, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या पुढाकारातून शुक्रवारी जालन्यात सर्वधर्मीय जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात वैभवी देशमुख हिने आम्हाला न्याय द्यावा, अशी साद सरकारकडे घातली.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हेही या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चानंतर जरांगे पाटील सभास्थळी सर्वसामान्यांत जाऊन बसले. तब्येत खराब असल्याने जरांगे पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले नाही.