तिसऱ्या लाटेची घंटा वाजली; जिल्हा प्रशासनाची कसोटी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:21 AM2021-07-20T04:21:19+5:302021-07-20T04:21:19+5:30
लहान मुलांना अधिक धोका; प्रशासनाकडून ११ बालरोगतज्ज्ञांचा टास्कफोर्स लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट ओसरत ...
लहान मुलांना अधिक धोका; प्रशासनाकडून ११ बालरोगतज्ज्ञांचा टास्कफोर्स
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट ओसरत नाही तोच तज्ज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत दिले आहेत. ही तिसरी लाट लहान मुलांसाठी अधिक घातक असून, यापासून बचावाचे मोठे आव्हान नागरिकांप्रमाणेच जिल्हा प्रशासनावरही येऊन ठेपले आहे.
कोरोनामुळे डबघाईस आलेले उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी एकीकडे आग्रह धरला जात आहे. यामुळे जालना जिल्ह्याचा विचार करता शनिवार, रविवार कडक निर्बंध लागू केले असून, या दिवशी केवळ अत्यावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू आहेत. तर सोमवार ते शुक्रवार सर्व व्यवहार खुले करण्यात आले आहेत; परंतु यालाही वेळेची मर्यादा घालून दिली आहे. सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे व्यवहार सुरू ठेवण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र आयसीयूसह ११ बालरोगतज्ज्ञांचा टास्कफोर्सची निर्मिती केली आहे. यामुळे अचानक रुग्णसंख्या वाढल्यास त्यांना तातडीने उपचार देण्यास मदत होणार आहे.
ऑक्सिजनची मुबलकता
जालना जिल्ह्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिकचे लक्ष घातले. यामुळे जिल्ह्याला पाहिजे तेवढा कोरोनाचा फटका बसला नाही. उपचार आणि ऑक्सिजन वेळेवर मिळत गेल्याने दिलासा मिळाला.
जिल्ह्यात स्टील उद्योगांनी जवळपास ५ ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट उभे केले असून, जिल्हा रुग्णालयात सीएसआर निधीतून दोन ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट उभे आहेत.
ऑक्सिजन निर्मितीसोबतच त्याच्या साठवणुकीचीही मोठी जबाबदारी असते. यासाठी देखील जिल्हा रुग्णालयात २० टन ऑक्सिजन साठवणुकीचा प्लांट उभारण्यात आला आहे. यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
एकीकडे सर्वत्र अनलॉक करण्यात आल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत आहे. ती गर्दी न करण्याचे आवाहन करूनही नागरिक याला दाद देत नाहीत, त्यामुळे आता पोलीस आणि पालिका प्रशासनाला लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
नागरिकांची जबाबदारी
पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाने अनेक कुटुंब उद्ध्वस्थ केली आहेत. त्यामुळे नागरिकांनीच गर्दी टाळून तिसरी लाट रोखावी, ही जबाबदारी खऱ्या अर्थाने संपूर्ण नागरिकांवर राहणार आहे.
तिसरी लाट रोखण्यासाठी बराच कालावधी आरोग्य यंत्रणेला मिळाला आहे. त्यामुळे यंत्रणा आधीपासूनच कामाला लागली आहे. लहान मुलांसाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र शंभर खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, कोविड हॉस्पिटलप्रमाणेच तात्पुरते रुग्णालय उभारण्यासाठीचे काम देखील प्रगतिपथावर आहे. ऑक्सिजन आणि अन्य औषधींचा साठाही उपलब्ध करण्यासाठी नियोजन केले आहे.
- डॉ. प्रताप घोडके, जालना