समाजवादी समाज व्यवस्थेसाठी भगतसिंग अभ्यासण्याची गरज..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 01:16 AM2019-10-02T01:16:41+5:302019-10-02T01:16:58+5:30
समाजवादी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी तरुणांनी भगतसिंग मुळातून अभ्यासावेत, आवाहन डॉ. मारोती तेगमपुरे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भगतसिंगांना अपेक्षित असलेला समाज निर्माण करण्यासाठी युवकांनी विवेकनिष्ठ होऊन समतेवर आधारलेला समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आज देशातील वातावरण विवेकाला मारक आहे. असं म्हटलं जात की, ज्यांना चिकित्सा नको असते ते हळूहळू ज्ञानाचेच विरोधक होत जातात आणि ते नवनिर्मितीचेच शत्रू बनतात. या सर्व बाबींना छेद द्यायचा असेल तर भगतसिंग यांचे विचार आणि जीवन मुळातून समजून घेतले पाहिजे. समाजवादी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी तरुणांनी भगतसिंग मुळातून अभ्यासावेत, आवाहन डॉ. मारोती तेगमपुरे यांनी केले.
जालना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शहीद भगतसिंग विचारमंच आयोजित शहीद भगतसिंग व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. व्याख्यानमालेच्या दुसऱ्या वर्षीच्या व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शहीद भगतसिंग अध्यासन केंद्राचे प्रा. सुधाकर शेंडगे यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबड येथील गोदावरी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे यांची उपस्थिती होती. मंचावर प्राचार्य डॉ सुनंदा तिडके, अॅड. कैलास रत्नपारखे, सय्यद शाकेर, अनुराधा हेरकर, सुनील रत्नपारखे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रा. सुधाकर शेंडगे म्हणाले, भगतसिंग यांच्या विचारांची आवश्यकता पाहण्याअगोदर भगतसिंग यांना समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आज प्रत्येक महापुरुषांचे दैवीकरण करण्याचे काम सुरू असून, तरुण मात्र यामध्ये गुरफटत जात आहेत. आज देशातील तरुणांना ख-या अर्थाने भगतसिंगांच्या विचारांची गरज आहे. त्यांच्या विचारातूनच एक समाजवादी राष्ट्र आपण निर्माण करू असे प्रतिपादन प्रा. शेंडगे यांनी केले. अॅड. अनिल मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले.